कोल्हापूर : ८० लाखाच्या प्लॉटची परस्पर खरेदी, बोगस व्यक्ती व कागदपत्रके सादर करुन व्यवहार : सहा जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 06:08 PM2017-12-23T18:08:21+5:302017-12-23T18:14:33+5:30
बनावट कागदपत्रे तयार करून राजोपाध्येनगर येथील ८० लाख रुपयांचा सहा गुंठेचा प्लॉट परस्पर विक्री केल्याप्रकरणी सहा जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. २२) गुन्हा दाखल झाला. संशयित विलास तुमाराम मेथे (रा. बोरीवडे, ता. पन्हाळा), प्रशांत मधुकर माने (रा. शास्त्रीनगर, जि. सांगली), अशोक श्रीपाल पाटील (रा. झेंडा चौक, इचलकरंजी), विनोद रामचंद्र सुतार (रा. बिंदू चौक, कोल्हापूर) व अज्ञात महिला अशी त्यांची नावे आहेत.
कोल्हापूर : बनावट कागदपत्रे तयार करून राजोपाध्येनगर येथील ८० लाख रुपयांचा सहा गुंठेचा प्लॉट परस्पर विक्री केल्याप्रकरणी सहा जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. २२) गुन्हा दाखल झाला. संशयित विलास तुमाराम मेथे (रा. बोरीवडे, ता. पन्हाळा), प्रशांत मधुकर माने (रा. शास्त्रीनगर, जि. सांगली), अशोक श्रीपाल पाटील (रा. झेंडा चौक, इचलकरंजी), विनोद रामचंद्र सुतार (रा. बिंदू चौक, कोल्हापूर) व अज्ञात महिला अशी त्यांची नावे आहेत.
या बोगस प्लॉट विक्री प्रकरणात महसूल विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचा हात असल्याचा संशय असून त्यांच्याकडे कसून चौकशी केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.
अधिक माहिती अशी, आशा रामयाद यादव (वय ६२, रा. शिवशक्ती बंगला, नलवडे कॉलनी, प्रतिभानगर) यांचा राजोपाध्येनगर येथे तीन गुंठ्यांचे दोन प्लॉट आहेत. पती रामयाद यादव यांनी पंचवीस वर्षापूर्वी ते खरेदी केले होते. त्यांच्या निधनानंतर आशा यांचे नावावर हे प्लॉट झाले. त्या व मुलगा राकेश असे दोघेच घरी असतात. रिकाम्या प्लॉटकडे त्यांचे जाणे-येणे कधी नव्हते.
महिन्यापूर्वी त्यांच्या जागेवर एक फलक लागला. त्यावर ही जागा खरेदी करणार असून यासंबधी कोणाचा काही आक्षेप असल्यास संपर्क साधावा अशी नोटीस खरेदी करणाऱ्या ग्राहकाच्या वकीलाची लागली होती. ही नोटीस आशा यादव यांच्या निदर्शनास आली. आपण जागा विकण्यास काढली नसतानाही त्याठिकाणी विक्रीचा फलक लागल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी संबधीत फलकावरील मोबाईल नंबरवर संपर्क करुन माहिती घेतली असता दोन्ही प्लॉट विलास मेथे यांचे नावावर खरेदी झालेचे सांगण्यात आले.
हे ऐकून त्यांना धक्काच बसला. त्यांनी नातेवाईकांच्या मदतीने कसबा बावडा येथील सहायक दूय्यम निंबधक कार्यालयात चौकशी केली असता बनावट कागदपत्रे हजर करुन दस्ताद्वारे सहा गुंठ्यांच्या प्लॉटची परस्पर विक्री केलेचे दिसून आले. त्यांनी संशयित विलास मेथे याचेसह बनावट खरेदीपत्रकारवर साक्षीदार असणाऱ्या व आशा यादव, राकेश यादव यांचे नावे बनावट व्यक्ती उभ्या केलेल्या अशा सहा जणांविरोधात शाहुपूरी पोलीसांत फिर्याद दिली.
आसुर्ले पोर्लेतील लँड माफियाचे कृत्य
विलास मेथे हा शेतकरी आहे. त्याची कोल्हापूरात प्लॉट खरेदी करण्याची आर्थिक परिस्थितीही नाही. आसुर्ले पोर्ले (ता. पन्हाळा) येथील एका लँड माफीयाने त्यांना कमिशनचे आमिष दाखवून त्यांचे नावावर बनावट कागदपत्रके सादर करुन प्लॉट केला. मेथे यांच्या नावावर या परिसरात तीन-चार प्लॉट खरेदी झालेची नोंद असल्याचे निदर्शनास आले आहे.
पोर्लेतील त्या लँड माफियावर यापूर्वी विविध पोलीस ठाण्यात वीस पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. कायद्याच्या बाहेर राहून खोटे कागदपत्रके तयार करुन तो जमिन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. त्याचे जिल्हाभर रॅकेट आहे. नोकऱ्या लावतो म्हणून त्याने अनेकांना गंडा घातला आहे. या रॅकेटने शहरातील अशा अनेक रिकाम्या जागेचें बनावट कागदपत्राद्वारे खरेदी व्यवहार केल्याचे पुढे आले आहे.