कोल्हापूर : कोल्हापूरच्या कढईत वांग्याचे विश्वविक्रमी भरीत -कोगील बुद्रुक येथे हस्तांतरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:45 AM2018-09-22T00:45:44+5:302018-09-22T00:49:32+5:30
कोल्हापुरातील स्फूर्ती उद्योग समूहाने तयार केलेल्या पाचशे किलो वजनाच्या कढईमध्ये जळगाव येथे २१ डिसेंबरला २५०० किलोंचे वांग्याचे भरीत बनविण्याचा विश्वविक्रम होणार आहे.
कणेरी : कोल्हापुरातील स्फूर्ती उद्योग समूहाने तयार केलेल्या पाचशे किलो वजनाच्या कढईमध्ये जळगाव येथे २१ डिसेंबरला २५०० किलोंचे वांग्याचे भरीत बनविण्याचा विश्वविक्रम होणार आहे. जळगावच्या मराठी प्रतिष्ठानतर्फे आयोजित हा विश्वविक्रम प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठीच्या या कढईचे हस्तांतरण शुक्रवारी कोगील बुद्रुक (ता. करवीर) येथे केले.
कोगील बुद्रुक येथील स्फूर्ती उद्योग समूहाच्या कारखान्यात खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते या कढईमध्ये अकरा फूट लांबीचा सरोटा फिरवून तिचे उद्घाटन केले. त्यासह मराठी प्रतिष्ठान आणि शेफ विष्णू मनोहर यांच्याकडे कढई हस्तांतरित केली. यावेळी चिदानंद स्वामी, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. जमील देशपांडे, सचिव विजय वाणी, स्फूर्ती समूहाचे प्रशांत मेहता, चिराग मेहता, प्रकाश मेहता, नीलेश पै, देवधर शहापूरकर, प्राजक्ता शहापूरकर प्रमुख उपस्थित होते. यावेळी स्फूर्ती समूहाचे धवल मेहता यांनी कढई कशी तयार केली याची माहिती दिली.
शेफ विष्णू मनोहर म्हणाले, या कढईमध्ये पुढे नाशिकमध्ये तीन हजार किलोंची मिसळ करणार आहोत. कोल्हापूरमध्ये खाद्यपदार्थांतील विश्वविक्रम करणार आहे. नीलेश पै यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गौरव द्विवेदी, अभियंता धनंजय कराळे, ‘गोशिमा’चे अध्यक्ष लक्ष्मीदास पटेल, उपाध्यक्ष श्रीकांत पोतनीस, सुजितसिंग पवार, कोगील बुद्रुकचे युवराज पाटील, शहाजी मोहिते, आदी उपस्थित होते. किरिट मेहता यांनी आभार मानले.
नागपूरमध्ये चाचणी
दहा बाय दहा फुटांचा व्यास असलेली आणि चार हजार लिटर क्षमतेची ही कढई येथून नागपूरला नेली जाणार आहे. त्या ठिकाणी शेफ विष्णू मनोहर तिची चाचणी घेणार आहेत. त्यानंतर तेथून जळगाव येथे कढई आणली जाणार आहे. ही कढई क्रेनने उचलावी लागते.
कोल्हापूरसाठी अभिमानास्पद
खासदार महाडिक म्हणाले, कोल्हापुरात नवनवीन उद्योग क्षेत्रांत प्रयोग होतात. येथील अनेक उपक्रम चांगले असून ते गिनीज रेकॉर्डपर्यंत जातात, हे अभिमानास्पद आहे.
कोल्हापुरातील स्फूर्ती उद्योग समूहाने बनविलेली पाचशे किलोंची कढई कोगील बुद्रुक (ता. करवीर) येथून शुक्रवारी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते मराठी प्रतिष्ठानकडे हस्तांतरित केली. डावीकडून चिदानंद स्वामी, विजय वाणी, विष्णू मनोहर, जमील देशपांडे, नीलेश पै, आदी उपस्थित होते.