कोल्हापूर : स्वत:ला चाकूने भोसकून वृद्धेचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 11:44 AM2018-08-30T11:44:14+5:302018-08-30T11:48:11+5:30
दीर्घ आजारास कंटाळून एका वृद्ध महिलेने धारदार चाकू स्वत:च्या पोटात भोसकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवार पेठेतील अकबर मोहल्ला येथे घडली.
कोल्हापूर : दीर्घ आजारास कंटाळून एका वृद्ध महिलेने धारदार चाकू स्वत:च्या पोटात भोसकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी दुपारी सोमवार पेठेतील अकबर मोहल्ला येथे घडली.
जुबेदा इब्राहिम पठाण (वय ६५) असे या वृद्धेचे नाव आहे. त्यांना पोटात चाकू अडकलेल्या गंभीर अवस्थेत शेजाऱ्यांनी व नातेवाइकांनी उपचारासाठी तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केल्याने सुदैवाने त्यांचे प्राण वाचले.
याबाबत माहिती अशी की, अकबर मोहल्ला येथे जुबेदा पठाण या आपला मुलगा, सून, नातवासह राहतात. बुधवारी दुपारी त्यांचा मुलगा इरफान पठाण हे नोकरीनिमित्त घराबाहेर पडले होते. त्यांच्या सूनही घरी नव्हत्या. घरी कोणीही नसल्याचे पाहून जुबेदा पठाण या वृद्धेने आपल्या उजव्या हातावर धारदार चाकूने वार करून घेतले, त्यानंतर तोच चाकू त्यांनी आपल्याच पोटात खुपसला. तो चाकू त्यांच्या पोटातच अडकून राहिला.
त्यावेळी प्रचंड रक्तस्राव झाल्याने त्या जमिनीवर बेशुद्ध पडल्या. त्यानंतर काही वेळाने त्यांचा १७ वर्षीय नातू घरी आला. त्यावेळी घरचा दरवाजा बंद होता. त्याने दरवाजा उघडून आत पाहिले असता आजी जुबेदा पठाण ह्या जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडल्या होत्या.
त्याने आरडाओरडा केला. त्यानंतर जमलेल्या नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी त्यांना पोटात चाकू अडकलेल्या अवस्थेतच तातडीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करून चाकू काढण्यात आला; पण त्या अत्यवस्थ आहेत.
दीर्घ आजारास कंटाळून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत रात्री उशिरापर्यंत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.