कोल्हापूर : त्र्यंबोली यात्रा शनिवारी पाचव्या माळेला, अंबाबाई-त्र्यंबोलीची होणार भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 03:36 PM2018-10-11T15:36:02+5:302018-10-11T15:38:53+5:30
शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला (शनिवारी) त्र्यंबोली देवीची यात्रा होणार आहे. या दिवशी आपल्या प्रिय सखीचा रुसवा काढण्यासाठी अंबाबाई स्वत: पालखीत विराजमान होवून लव्याजम्यानिशी त्र्यंबोली टेकडीला जाते. यावेळी गुरव घराण्यातील मुलीच्या हस्ते कोहळा छेदन विधी होईल.
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला (शनिवारी) त्र्यंबोली देवीची यात्रा होणार आहे. या दिवशी आपल्या प्रिय सखीचा रुसवा काढण्यासाठी अंबाबाई स्वत: पालखीत विराजमान होवून लव्याजम्यानिशी त्र्यंबोली टेकडीला जाते. यावेळी गुरव घराण्यातील मुलीच्या हस्ते कोहळा छेदन विधी होईल.
यंदा प्रथम, आणि द्वितीया हे दोन्ही तिथी बुधवारीच असल्याने ललिता पंचमी यंदा नवरात्रौत्सवाच्या चौथ्या दिवशीच आली आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी श्री अंबाबाईचा अभिषेक झाल्यानंतर दहा वाजता सोन्याच्या पालखीतून देवीची उत्सवमूर्ती आपल्या लव्याजम्यानिशी त्र्यंबोली टेकडीकडे प्रस्थान करेल. तत्पूर्वी जुना राजवाड्यातील तुळजाभवानी देवी तसेच गुरूमहाराजांच्याही पालख्या त्र्यंबोलीस निघतील.
वाटेत भक्तांकडून सेवा व आरती स्विकारत पालखी बारा एकच्या दरम्यान त्र्यंबोली टेकडीवर पोहोचेल. येथे त्र्यंबोली देवी व श्री अंबाबाईची भेट होईल. छत्रपती कुटूंबाकडून झाल्यानंतर गुरव घराण्यातील कुमारीच्या हस्ते कोहळा छेदन विधी होईल. त्यानंतर पालख्या परतीसाठी प्रस्थान करतील.
सायंकाळी पाचच्या दरम्यान अंबाबाईची पालखी घाटी दरवाजा मार्गे मंदिरात येईल. एक प्रदक्षिणा घालून काही वेळ गरुड मंडपात विसावेल त्यानंतर देवीची उत्सवमूर्ती गाभाऱ्यात जाईल. रात्री मंदिर परिसरात पालखी सोहळा होईल.