कोल्हापूर : पळून गेलेल्या चार आरोपीपैकी दोघांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:54 PM2018-05-19T12:54:41+5:302018-05-19T13:58:24+5:30
शाहूवाडी पोलिस ठाण्यातील कोठडीचे गज वाकवून पळून गेलेल्या चार आरोपीपैकी दोन आरोपींना पकडण्यात कोल्हापूर पोलिसांना शनिवारी सकाळी यश आले. इतर दोघांचा कसून शोध सुरु आहे.
कोल्हापूर : शाहूवाडी पोलिस ठाण्यातील कोठडीचे गज वाकवून पळून गेलेल्या चार आरोपीपैकी दोन आरोपींना पकडण्यात कोल्हापूर पोलिसांना शनिवारी सकाळी यश आले. इतर दोघांचा कसून शोध सुरु आहे.
सूरज सर्जेराव दबडेसह (रा. वाठार, ता. हातकणंगले), गोविंद वसंत माळी, ओंकार महेश सूर्यवंशी (दोघे रा. कासेगांव, ता. वाळवा, जि. सांगली) व विराज गणेश कारंडे (रा. दरवेश पाडळी, ता. हातकणंगले) हे चार आरोपी शुक्रवारी पहाटे शाहूवाडी पोलीस ठाण्यातील कोठडीचे गज वाकवून पळून गेले होते.
दरोडा, घरफोडी अशा गंभीर स्वरूपाचे ३४ गुन्हे दाखल असलेल्या या चारजणांच्या टोळीला कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातून शाहूवाडी पोलिसांनी एका गुन्ह्यात या चौघांना चार दिवसांपूर्वी अटक केली होती.
शनिवारी सकाळी ओंकार महेश सूर्यवंशी (दोघे रा. कासेगांव, ता. वाळवा, जि. सांगली) आणि विराज गणेश कारंडे (रा. दरवेश पाडळी, ता. हातकणंगले) या दोन आरोपींना किणी-वाठार जवळ पकडण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आले आहे. त्यांना पेठवडगाव येथील पोलिस ठाण्यात ठेवले असून सायंकाळी कोल्हापूरात आणण्यात येणार आहे.
सूरज दबडे आणि गोविंद माळी यांच्या शोधासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, बेळगांव आदी ठिकाणी पथके रवाना झाली आहे. यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची व शाहूवाडी पोलीस ठाण्याची प्रत्येकी दोन, कोडोली, पन्हाळा, वडगांव, शिरोळ आदींचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर नाकाबंदी करण्यात आली आहे.
दरम्यान, याप्रकरणी सेवा बजावत असलेले सहायक फौजदार विश्वास शेडगे, पोलीस नाईक महेंद्र नामदेव पाटील (बक्कल नंबर ९२०) व श्रीकांत बापू दाभोळकर (बक्कल नंबर १०३५) हे तिघेजण झोपल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. ठाणे अंमलदार पोलीस नाईक सुरेश ढवळे होते.
याचबरोबर पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांच्यासह अन्य पोलिसांचीही चौकशी होणार आहे. याबाबतचा अहवाल पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील देणार आहेत. कर्तव्यात कसूर ठेवल्याचा ठपका या तीन पोलिसांवर ठेवण्यात आला आहे.
दरोडा, घरफोडी अशा गंभीर स्वरूपाचे ३४ गुन्हे दाखल असलेल्या या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गंत (मोक्का)चा प्रस्ताव पाठविला आहे.