कोल्हापुरात दोन गटांत धुमश्चक्री, तुफान दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:47 AM2019-06-05T00:47:50+5:302019-06-05T00:47:55+5:30
कोल्हापूर : येथील सोमवार पेठेत लहान मुलांच्या क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून दोन गटांत धुमश्चक्री उडाली. दोन गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक ...
कोल्हापूर : येथील सोमवार पेठेत लहान मुलांच्या क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून दोन गटांत धुमश्चक्री उडाली. दोन गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक करीत परिसरातील अनेक वाहनांची मोडतोड केली. तसेच दोन घरांवर हल्लाही करण्यात आला. या दगडफेकीत दोन पोलीस अधिकाऱ्यांसह १० जण जखमी झाले. ही घटना मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव होता; तर दोन्ही गटांकडून झालेल्या हल्ल्यामुळे रस्त्यावर दगड आणि बाटल्यांचा खच पडला होता.
पोलीस तसेच जलद कृती दल, ‘एसआरपीएफ’च्या तुकड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी हल्लेखोरांना पांगविण्यासाठी किरकोळ लाठीमार केला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी , ४-५ दिवसांपूर्वी लहान मुलांच्या क्रिकेट खेळण्यावरून दोन गटात वाद झाला होता. यावेळी ज्येष्ठांनी मध्यस्थी करून तो मिटविला होता. मंगळवारी रात्री हा वाद पुन्हा उफाळला. त्यावेळी एकमेकांत शिवीगाळीचा प्रकार झाला. यावेळी एका कार्यकर्त्यांला मारहाण करण्यात आली. या कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचे समजताच त्याच्या समर्थकांनी विरोधी गटाच्या कार्यकर्त्याच्या घरावर हल्ला चढविला. युवकांनी त्याच्या घरावर तुफान दगडफेक, केली, बाटल्या फेकल्या. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गोंधळ उडाला. आरडाओरडा सुरू झाला. जमाव जमू लागला. या दरम्यानच दुसºया गटाने प्रतिहल्ला म्हणून तुफान दगडफेक केली. तातडीने पोलीस यंत्रणा घटनास्थळी आल्यानंतरही पोलिसांसमोरच दोन्ही गटांची एकमेकांवर दगडफेक सुरू होती. त्यामुळे तणावात भर पडली. पोलिसांनी बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांवरही दगडफेक झाली. दगडफेकीत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत बाबर जखमी झाले.तर सहायक पोलीस निरीक्षक सुनील पवार आणि पोलीस कर्मचारी अमर पाटील हेही जखमी झाले.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर शीघ्र कृती दल, एसआरपीएफ या यंत्रणेस पाचारण करण्यात आले. त्यांच्यासोबत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासमवेत वरिष्ठ पोलिस अधिकारी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. तोपर्यंत हल्लेखोरांनी परिसरातील दुचाकी, चारचाकी वाहनांची मोडतोड केली.
लहान मुलांच्या क्रिकेट खेळण्यावरून दोन गटांत वाद होऊन दोन्हीकडून दगड, बाटल्या एकमेकांवर फेकण्यात आल्या. यामध्ये पाच नागरिक व तीन पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आली आहे. या घटनेशी संबंधित समाजकंटकांना ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे.
-डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर.