कोल्हापूर : विशाळगडाजवळील गेळवडे जलाशयात दोघेजण बुडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 04:19 PM2018-03-10T16:19:53+5:302018-03-10T16:19:53+5:30
शाहूवाडी तालुक्यातील विशाळगडाजवळील गेळवडे जलाशयात पोहण्यासाठी उतरलेल्या आठजणांच्या तरुणांपैकी दोघेजण पाण्यात बुडाले. शनिवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. गेल्या दोन महिन्यात या जलाशयात बुडण्याची ही तिसरी घटना असून यापूर्वी दोघांचा बळी गेला आहे.
आंबा : शाहूवाडी तालुक्यातील विशाळगडाजवळील गेळवडे जलाशयात पोहण्यासाठी उतरलेल्या आठजणांच्या तरुणांपैकी दोघेजण पाण्यात बुडाले. शनिवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. गेल्या दोन महिन्यात या जलाशयात बुडण्याची ही तिसरी घटना असून यापूर्वी दोघांचा बळी गेला आहे.
इजाज पीर अहमद बावली (वय २७) आणि निदाल मलिक बावली (वय १८, दोघेही राहणार लाजगौरी-कर्नाटक) अशी पाण्यात बुडालेल्यांची नावे आहेत.
कर्नाटकातील लाजगौरी येथील आठजणांचा गट तवेरा गाडीने पर्यटनासाठी विशाळगड येथे निघाला. सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गेळवडे जलाशयाजवळ ते थांबले. चालकासह सर्वजण या जलाशयात पोहण्याचा आनंद घेत थांबले, पण त्यातील काहीजणांना पाण्याचा अंदाज आला नाही. इतर तरुण पाण्यातून बाहेर पडले, परंतु त्यांच्यातील दोघेजण आढळून आले नाहीत. साथीदारांनी त्यांचा पाण्यात शोध घेतला, पण त्यांचा मागमूसही आढळून आला नाही.
तरुणांनी तत्काळ ही माहिती शाहूवाडी पोलिसांना दिली. शाहूवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अनिल गाडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती पाहून त्यांनी बचाव पथकाला पाचारण केले आहे. अद्याप या तरुणांचा मृतदेह मिळून आलेला नाही. शाहूवाडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
गेळवडे जलाशयातील तिसरी घटना
विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या हा गेळवडेचा जलाशय अतिशय रमणीय आहे. वाटेतच असल्यामुळे भाविकांना आणि पर्यटकांना या जलाशयाची भुरळ पडते. यापूर्वीही या जलाशयात पोहण्यासाठी उतरलेल्यांचा बळी गेला आहे. गेल्या तीन महिन्यातील ही तिसरी घटना असून यापूर्वी दोघांचा बळी गेला आहे. गेळवडे ग्रामपंचायतीनेही या परिसरात या जलाशयात पोहण्यास मनाई असल्याचा आणि तो धोकादायक असल्याचा फलक लावलेला आहे. तरीही उत्साही तरुण येथील पाण्यात उतरतात.