कोल्हापूर : डेंग्यू रोखण्यास असमर्थ, मनपाविरुध्द शिवसेनेची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 04:50 PM2018-08-27T16:50:50+5:302018-08-27T17:02:30+5:30
डेंग्यूला रोखण्यास महापालिका प्रशासन असमर्थ ठरल्याच्या निषेधार्थ सोमवारी शिवसेनेच्या वतीने आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करुन जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी निष्क्रिय अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, अशी मागणीही शिवसैनिकांनी केला.
कोल्हापूर : शहरात गेल्या काही महिन्यापासून डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असून महानगरपालिका प्रशासनाची निष्क्रीयता व ढोंगीपणाचे अनेक बळी गेले आहेत व शेकडो रुग्ण बाधित आहेत.
डेंग्यूला रोखण्यास महापालिका प्रशासन असमर्थ ठरल्याच्या निषेधार्थ सोमवारी शिवसेनेच्या वतीने आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करुन जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी निष्क्रिय अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, अशी मागणीही शिवसैनिकांनी केला.
गेल्या काही महिन्यापासून कोल्हापूर शहरात डेंग्यू या भयानक रोगाने अक्षरश: दुमाकुळ घातला असून शेकडो जणांना त्याची बाधा झाली आहे. आठ रुग्ण दगावले आहेत. याला महानगरपालिका आरोग्य विभागाची यंत्रणाच जबाबदार आहे.
त्याच्या निषेधार्थ शिवसेने सोमवारी आधी महानगरपालिका मुख्य प्रशासकीय कार्यालयासमोर निदर्शने केली. नंतर आयुक्त अभिजित चौधरी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. या प्रश्नाकडे आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे, आणि शहरातील नागरीकांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आयुक्त चौधरी यांनी शिवसैनिकांचे म्हणणे जाणून घेतले. आरोग्य विभागातर्फे स्वच्छता, औषध फवारणी, धूर फवारणी सातत्याने करणे आवश्यक आहे. ज्या अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयपणामुळे ही साथ पसरलेली आहे, त्या अधिकाऱ्यांना ताबडतोब बडतर्फ करावे, म्हणजे यंत्रणा कामाला लागेल, असे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी आयुक्तांना सांगितले.
शहरात किमान दोन हजार रुग्णांना डेंग्यू झाला असून ते खासगी रुग्णालयातून उपचार घेत आहेत यावरुनच या रोगाचे वास्तव स्पष्ट होते, असेही पवारांनी निदर्शनास आणून दिले.
गणेशोत्सव जवळ आलेला आहे. त्यापूर्वी शहरातील सर्व रस्ते, सर्व कोंडाळे, गटारी, नाले साफ करुन घ्यावेत, अशी सुचना शहर प्रमुख दुर्गेश लिंग्रज यांनी केली. शहरातील गांधी मैदानावर मोठ्याप्रमाणात पाणी साचून राहते. शहरातील अनेक मुताऱ्या स्वच्छ केल्या जात नाहीत. बऱ्याच ठिकाणी ड्रेनेजमधील सांडपाणी रस्त्यावर पसरून दुर्गंधी सुटलेली असते याकडे मनपा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष पुरवावे, असे उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी सांगितले.
बांधकाम परवाने रद्द करणार : आयुक्त
शहरात वारंवार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून राहते. त्यातून डेंग्यूच्या डासांची निर्माती होत आहे. आम्ही शहरात प्रबोधनाची मोहिम हाती घेतली आहे. घराघरात जाऊन जनजागृती केली जात आहे. प्रत्येक कुटुंबाने खबरदारी घेतली तर डेंग्यूच्या डासांचा बंदोबस्त प्रभावीपणे करता येईल,असे आयुक्त चौधरी यांनी शिवसैनिकांशी बोलतना सांगितले. बांधकाम साईटवर जेथे डेंग्यूच्या डास आळ्या सापडतील त्या बांधकामा व्यावसायिकांना दंड करण्यात आला होता आता परवाने रद्द केली जातील, असेही आयुक्तांनी सांगितले.