कोल्हापूर : विनाअनुदानित शिक्षकांची ‘काळी दिवाळी’, सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 05:45 PM2018-11-06T17:45:04+5:302018-11-06T17:47:11+5:30
अनुदान देण्यासह निधी घोषित करण्याबाबत शासनाने दिलेले आश्वासन पाळले नसल्याच्या निषेधार्थ विनाअनुदानित शिक्षकांनी मंगळवारी ‘काळी दिवाळी’ साजरी केली. त्यांनी महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून शासन आणि सरकारचा निषेध केला.
कोल्हापूर : अनुदान देण्यासह निधी घोषित करण्याबाबत शासनाने दिलेले आश्वासन पाळले नसल्याच्या निषेधार्थ विनाअनुदानित शिक्षकांनी मंगळवारी ‘काळी दिवाळी’ साजरी केली. त्यांनी महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून शासन आणि सरकारचा निषेध केला.
येथील शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे सकाळी साडेदहा वाजता समितीचे पदाधिकारी आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील विनाअनुदानित शिक्षक जमले. त्यांनी या कार्यालयासमोर ठिय्या मारला. ‘अनुदान आमच्या हक्काचे’, ‘हम सब एक है’, अशा घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून सोडला. सरकार आणि मुख्यमंत्र्यांचा निषेध केला.
झालेल्या निषेध सभेत समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे म्हणाले, नागपूरमधील पावसाळी अधिवेशनामध्ये २० जुलै २०१८ रोजी मुख्यमंत्र्यांनी प्रचलित नियमानुसार १00 टक्के अनुदान देण्याबाबत आणि अघोषित सर्व शाळा निधीसह घोषित करणे याबाबत निर्णय लवकरच घेऊ, असे आश्वासन दिले.
मात्र, अद्यापही या आश्वासनाची पूर्तता शासनाकडून झाली नसल्याने समितीतर्फे मंगळवारी काळी दिवाळी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सुनील कल्याणी, प्रमोद पाटील, सुनील शेंडे, जयंत आसगावकर, दादा लाड, व्ही. जे. पवार, गजानन काटकर, व्ही. एच. सपाटे, प्रकाश पाटील, शिवाजी खापणे, राजेंद्र कोरे, आदी सहभागी झाले.
अन्यथा १९ नोव्हेंबरपासून बेमुदत शाळा बंद
प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यास शासनाने दिरंगाई केल्यास दि. १९ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशन काळामध्ये राज्यात बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्यात येईल. मुंबईतील आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन केले जाणार असल्याचे जगदाळे यांनी सांगितले.
कार्यालयाच्या भिंतीवर निवेदन चिकटविले
या आंदोलनाबाबत समितीने गेल्या १0 दिवसांपूर्वी शिक्षण उपसंचालकांना पत्र दिले होते. तरीही मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यास मंगळवारी एकही अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. त्याचा निषेध करत आंदोलनकर्त्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीवर निवेदन चिकटविले. काळी कपडे परिधान करून, डोक्याला काळी पट्टी बांधून आणि खिशाला काळी फित लावून या आंदोलनात शिक्षक सहभागी झाले.