कोल्हापूर : विनाअनुदानित शिक्षकांचे शाळा बंद आंदोलन; ‘महाआरती’ करून नोंदविला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 04:21 PM2018-09-05T16:21:08+5:302018-09-05T16:24:15+5:30
विनाअनुदानित शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षकांनी बुधवारी ‘शासनाची महाआरती’ आंदोलन केले. शिक्षक दिनादिवशी त्यांनी शाळा बंद ठेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करीत विविध प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध नोंदविला.
कोल्हापूर : विनाअनुदानित शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षकांनी बुधवारी ‘शासनाची महाआरती’ आंदोलन केले. शिक्षक दिनादिवशी त्यांनी शाळा बंद ठेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करीत विविध प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध नोंदविला. महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
येथील कोल्हापूर विभागीय शिक्षक उपसंचालक कार्यालयासमोर दुपारी साडेबारा वाजता शिक्षकांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. त्यानंतर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेसमोर मराठवाड्यातील शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते ‘शासनाची महाआरती’ करून सर्व आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकार आणि शासनाचा निषेध केला.
कृती समितीच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन शिक्षण उपनिरीक्षक डी. एस. पोवार यांना दिले. या आंदोलनात कृती समितीचे विभागीय अध्यक्ष सुनिल कल्याणी, उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, सचिव प्रकाश पाटील, जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे सभाअध्यक्ष एस. डी. लाड, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ, माध्यमिक शिक्षण सेवकांची पतसंस्थेचे तज्ज्ञ संचालक दादा लाड, खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, माजी शिक्षण सहसंचालक संपतराव गायकवाड, राजेश वरक, पुंडलिक रहाटे, आनंदा वारंग, गजानन काटकर, एस. एम. पाटील, आदी सहभागी झाले.