कोल्हापूर : ‘पाटाकडील’चेच हंगामावर निर्विवाद वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:07 PM2018-06-18T12:07:46+5:302018-06-18T12:07:46+5:30
कोल्हापूरच्या यंदाच्या फुटबॉल हंगामात पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’चेच वर्चस्व राहिले. यात वरिष्ठ गटातील सहापैकी सहा स्पर्धा जिंकत एकूणच फुटबॉल हंगामात सर्वत्र ‘पिवळ्या निळ्या’चीच चर्चा फुटबॉल रसिकांना करावयास भाग पाडले. सर्वाधिक वैयक्तिक बक्षिसे मिळविणारा संघ म्हणूनही गणला गेला.
सचिन भोसले
कोल्हापूर : कोल्हापूरच्या यंदाच्या फुटबॉल हंगामात पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’चेच वर्चस्व राहिले. यात वरिष्ठ गटातील सहापैकी सहा स्पर्धा जिंकत एकूणच फुटबॉल हंगामात सर्वत्र ‘पिवळ्या निळ्या’चीच चर्चा फुटबॉल रसिकांना करावयास भाग पाडले. सर्वाधिक वैयक्तिक बक्षिसे मिळविणारा संघ म्हणूनही गणला गेला.
हंगामाची सुरुवात १९ डिसेंबर २०१७ रोजी के. एस. ए. वरिष्ठ गट लीग स्पर्धेपासून झाली. हा मानांकनाचा के. एस. ए. करंडक ही प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ संघाबरोबर १४ गुण असतानाही नाणेफेकीचा कौल पाटाकडील संघाच्या बाजूने लागला. त्यामुळे हंगामाची सुरुवात के.एस.ए. लीगच्या विजेतेपदाने झाली. त्यानंतर झालेल्या राजेश चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यांतही खंडोबा तालीम मंडळ ‘अ’ संघास ४-० अशी मात करीत हा चषकही पटकाविला.
त्यानंतर झालेला महापौर चषकही प्रॅक्टिस ‘अ’ला २-० असे नमवत तिसरा चषक पटकाविला. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक बक्षिसांची स्पर्धा गणल्या गेलेल्या ‘अटल चषक’ फुटबॉल स्पर्धेतही ‘पाटाकडील’ने आपले वर्चस्व राखले.
यात प्रॅक्टिस क्लब ‘अ’चा २-० असा पराभव करीत हे विजेतेपद पटकाविले. त्यानंतर झालेल्या महापौर चषक फुटबॉल स्पर्धेतही ‘पाटाकडील’ने प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’चा २-१ असा पराभव करीत हेही विजेतेपद खिशात घातले.
त्यानंतर झालेल्या सतेज चषक स्पर्धेतही पारंपरिक प्रतिस्पर्धी दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ यांच्याबरोबर झालेल्या अंतिम लढतीत ४-४ अशी पेनल्टीवर बरोबरी झाली असताना उत्कंठावर्धक स्थितीत सडनडेथवर मात करीत हाही चषक पटकाविला.
हंगामाच्या अखेरीस झालेले ‘चंद्रकांत महासंग्राम’चेही विजेतेपद ‘पाटाकडील’ने बालगोपाल तालीम मंडळवर १-० अशी मात करीत सहजरीत्या खिशात घातले. त्यात आणखी एक मानाचा तुरा के.एस.ए.चा १४ वर्षांखालील स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळावर मात करीत, तर १७ वर्षांखालील ‘चंद्रकांत महासंग्राम’चे विजेतेपद गडहिंग्लज युनायटेड संघास पराभूत करून रोवला.
त्यामुळे १९ डिसेंबर २०१७ रोजी सुरू झालेला फुटबॉल हंगामाची सांगता १६ जून २०१८ रोजी झाली. या कालावधीत झालेल्या सहाही स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावून एकूणच फुटबॉल हंगामावर वर्चस्व राखले.
पाटाकडील संघास मिळालेले बक्षीस असे -
- के. एस. ए. लीग- ७० हजार
- राजेश चषक - १ लाख
- महापौर चषक - १ लाख
- सतेज चषक - १ लाख
- अटल चषक -५ लाख
- चंद्रकांत महासंग्राम ५ लाख ११
हंगामात झालेल्या स्पर्धेतील एकूण बक्षिसे अशी -
स्पर्धा एकूण बक्षिसांची रक्कम
- के. एस. ए. वरिष्ठ लीग १,५०,०००
- राजेश चषक ३,०००,००
- अटल चषक १५,००,००० (वैयक्तिकसह )
- महापौर चषक २,२५,०००
- सतेज चषक २,५०,०००
- चंद्रकांत महासंग्राम ३० लाख
सर्वाधिक मालिकावीर म्हणून ‘पाटाकडील’च्या हृषीकेश मेथे-पाटीलने मान मिळविला. त्यात एक दुचाकी, बुलेट; तर हंगाम संपता-संपता ‘महासंग्राम’च्या रूपाने ‘पाटाकडील’च्याच रणजित विचारेनेही बुलेट पटकाविली.
नियोजनबद्ध संघबांधणी, सरावातील सातत्य, खेळाडूंचे कठोर परिश्रम व संघाचे खंदे पाठराखे कै. पांडबा जाधव यांनी घालून दिलेल्या आदर्शांनुसार आमचा संघ तंत्रशुद्ध खेळत गेला अन् जिंकतही गेला.
- शरद माळी,
अध्यक्ष, पाटाकडील तालीम मंडळ फुटबॉल संघ