कोल्हापूर : पावसाळ्यात विजेबाबत दक्षता आवश्यक, कारणे समजून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 11:40 AM2018-06-04T11:40:31+5:302018-06-04T11:40:31+5:30
पारंपरिक किंवा अपारंपरिक स्त्रोतांपासून देशाच्या कानाकोपऱ्यांत तयार केलेली वीज ग्राहकांच्या दारात आणण्यासाठी लाखो किलोमीटर वीज वाहिन्यांचे जाळे (ग्रीड) देशात पसरलेले आहे. हा सारा पसारा उघडा आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींचा या यंत्रणेवर परिणाम होऊन त्यात बिघाड होण्याची शक्यता असते, असा बिघाड झाल्यास वीजपुरवठा खंडित होतो, अशी माहिती ‘महावितरण’च्या कोल्हापूर परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी विकास पुरी यांनी दिली.
कोल्हापूर : पारंपरिक किंवा अपारंपरिक स्त्रोतांपासून देशाच्या कानाकोपऱ्यांत तयार केलेली वीज ग्राहकांच्या दारात आणण्यासाठी लाखो किलोमीटर वीज वाहिन्यांचे जाळे (ग्रीड) देशात पसरलेले आहे. हा सारा पसारा उघडा आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींचा या यंत्रणेवर परिणाम होऊन त्यात बिघाड होण्याची शक्यता असते, असा बिघाड झाल्यास वीजपुरवठा खंडित होतो, अशी माहिती ‘महावितरण’च्या कोल्हापूर परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी विकास पुरी यांनी दिली.
तारेच्या जाळ्यातून घरात आलेली वीज असो की आकाशात लखलखणारी वीज असो, दोन्ही मध्ये प्रचंड ऊर्जा असते. आकाशात विजेचा कडकडाट सुरू झाला की घरातील वडीलधारी माणसे वीज उपकरणे बंद करतात. कारण उच्चदाबामुळे ते जळण्याची शक्यता असते.
दोन विद्युत चुंबकीय क्षेत्र एकत्र आल्याने दाब वाढतो व यंत्रणा बंद पडते तशी सोयच यंत्रणा वाचविण्यासाठी केलेली असते. वीज खांबात वीजपुरवठा उतरू नये यासाठी चॉकलेटी रंगाचे चिनीमातीचे इन्सुलेटर (चिमणी) खांबावर बसविले जातात.
हे इन्सुलेटर उन्ह किंवा वीजप्रवाहामुळे गरम झालेले असतात. त्यातच त्यावर पावसाचे थेंब पडले की, त्याला तडे जातात. ज्यामुळे वीजप्रवाह खांबातून जमिनीत उतरतो. अन लागलीच आपत्कालिन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होऊन फिडर (वीज वाहिनी) बंद पडतो.
जर हा फिडर बंद पडला नाही तर जीवित अथवा वित्तहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे फिडरला ब्रेकरची व्यवस्था केलेली असते. जेव्हा-केव्हा वीजपुरवठा अचानक खंडित होतो, त्यावेळी वीज उपकेंद्रातील कर्मचारी जवळच्या उपकेंद्राशी संपर्क साधून त्यांच्याकडे वीजपुरवठा आहे की नाही याची खात्री करत असतात.
वीजपुरवठा असल्याची खातरजमा झाल्यानंतर फिडर चालू केला जातो. जर फिडर पुन्हा ट्रीप झाला (बंद पडला) तर मात्र बिघाड झाल्याचे घोषित केले जाते. बिघाड शोधणे तेवढे सोपे नसते. ऊन-वाऱ्याची, पावसाची किंवा अंधाराची पर्वा न करता ही शोधमोहीम हाती घेतली जाते. वेळप्रसंगी बंद पडलेल्या वाहिनीचे सर्व खांब चढून तपासावे लागतात तर कधी हा बिघाड काही खांबादरम्यान सापडतो, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी पुरी यांनी दिली.
वीजपुरवठा खंडित झाल्यास येथे तक्रार करा
वीजपुरवठा खंडित झाल्यास पाच ते दहा मिनिटे थांबून ‘महावितरण’च्या टोल फ्री क्रमांकाला दूरध्वनी करावा. विजेसंबंधीच्या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यासाठी कंपनीने १९१२, १८००० २३३ ३४३५ व १८०० १०२ ३४३५ या तीन टोल फ्री क्रमांकाची सुविधा कंपनीने केली आहे.
मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राद्वारे या क्रमांकावर २४ तास सेवा दिली जाते. आलेल्या तक्रारी विशिष्ट अशा संगणकीय प्रणालीमार्फत संबंधित जनमित्र व अभियंत्यांमार्फत पोहोचवून त्याचे तातडीने निराकरण केले जाते. ‘महावितरण’च्या मोबाईल अॅपमधूनही विजेसंबंधीच्या तक्रारी नोंदविता येतात, अशी माहिती ‘महावितरण’च्या कोल्हापूर परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी विकास पुरी यांनी दिली.
अशी घ्या दक्षता
- * आपल्या घरात ‘ईएसीबी स्वीच’असणे गरजेचे आहे.
- * अर्थिंग सुस्थितीत असली पाहिजे. गरजेनुसार त्याची तपासणी करावी.
- * वीज उपकरणे किंवा वायरिंग ओलाव्यापासून किंवा पत्र्यापासून सुरक्षित असावी.
- * वीज उपकरणे हाताळताना पायात स्लीपर घालावी व वीजपुरवठा बंद झाल्याची खात्री करावी.
- * विद्युत खांबाला व ताणाला जनावरे बांधू नयेत.
- * विद्युत खांबाच्या खाली गोठे किंवा कडब्याची गंजी उभारू नयेत.
- * बिघाड नेमका कोठे झाला याची माहिती असल्यास वीज कंपनीला संपर्क करावा.
- * विजेच्या तारा तुटल्यास त्याला हात लावू नये. त्याची माहिती तातडीने वीज कंपनीला द्यावी.
- * नदीकाठच्या शेतकऱ्यांनी शेतीपंप, स्टार्टर, वीज मीटरबाबत विशेष दक्षता घ्यावी.