कोल्हापूर : मामाच्या गावाची अनोखी सहल, दोनदिवसीय मोफत सहल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 07:07 PM2018-10-30T19:07:36+5:302018-10-30T19:10:04+5:30
मामाचा गाव, आठवणीतील खेळ, निसर्ग, डोंगर, दऱ्या, मोकळे आकाश, पायवाटा... असे वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण जीवन अनुभवण्यासाठी १० ते २२ नोव्हेंबर असे दोनदिवसीय मोफत सहलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिल रायडर्स ग्रुपचे प्रमुख प्रमोद पाटील व संवेदना फौंडेशनचे राहुल चिकोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : मामाचा गाव, आठवणीतील खेळ, निसर्ग, डोंगर, दऱ्या, मोकळे आकाश, पायवाटा... असे वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण जीवन अनुभवण्यासाठी १० ते २२ नोव्हेंबर असे दोनदिवसीय मोफत सहलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिल रायडर्स ग्रुपचे प्रमुख प्रमोद पाटील व संवेदना फौंडेशनचे राहुल चिकोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रमोद पाटील म्हणाले, शाळा, क्लास, टी.व्ही., मोबाईल या सगळ्यांमध्ये मुलांचे बालपणच हरवून जात आहे. त्यामुळे मुलांना शारीरिक व मानसिक आरोग्य, एकाग्रता यांच्या समस्यांनी ग्रासलेले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी इतिहास, पर्यावरण, निसर्गतील विज्ञान समजावून घेण्याच्या हेतूने संवेदना फौंडेशन, हिल रायडर्स, कुतूहल फौंडेशन यांच्यातर्फे व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून या सहलीचे आयोजन केले आहे.
राहुल चिकोडे म्हणाले, या सहलीमध्ये १२ ते १४ वयोगटातील मुले-मुली सहभागी होऊ शकतात. पर्यावरण अभ्यासक अनिल चौगुले, कुतूहल फौंडेशनचे सचिन जिल्लेदार हे मार्गदर्शन करणार आहेत. दोनदिवसीय सहली पूर्णपणे मोफत आहेत. फटाके न उडविणाऱ्या मुलांना प्राधान्याने प्रवेश देण्यात येणार आहे.
गोखले कॉलेजजवळील हुतात्मा पार्क येथून सकाळी आठ वाजता सहलीस सुरुवात होणार आहे; तर समारोप दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजता हुतात्मा पार्क येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी शाहूपुरी येथील समिट अॅडव्हेंचर्स, न्यू शाहूपुरी येथे संपर्क साधावा. याप्रसंगी पर्यावरण अभ्यासक अनिल चौगुले, सूरज ढोली, सचिन जिल्लेदार, आदी उपस्थित होते.
या ठिकाणी भेट देणार
शहरातील ऐतिहासिक वारसास्थळे, साठमारी, जिल्हा पोलीस मुख्यालय येथील उंच तिरंगा ध्वज, पोलिसांच्या शस्त्रास्त्रांची ओळख, राजर्षी शाहू जन्मस्थळ, टाउन हॉल म्युझियम, दुर्मीळ वृक्षपरिचय, रजपूतवाडी येथे शिवारभेट, गुऱ्हाळ भेट, किल्ले पन्हाळा सैनिक स्कूल येथे रात्रमुक्कम, फिल्म शो, आकाशदर्शन, कॅम्प फायर, सूर्योदय, निसर्गखेळ, पक्षी निरीक्षक, पन्हाळागड दर्शन याबरोबरच आठवणीतले खेळ, सूरपाट्या, गोट्या, लगोरी, आट्यापाट्या अशा आनंददायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.