कोल्हापूर :‘कोरी पाटी’मधून उलगडणार विद्यापीठ हायस्कूलचे विश्र्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 12:01 PM2018-09-01T12:01:23+5:302018-09-01T12:09:16+5:30
राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने साकारलेल्या भक्तिसेवा विद्यापीठ शाळेचा शंभर वर्षांचा उज्ज्वल इतिहास ‘कोरी पाटी’ या माहितीपटातून उलगडणार आहे.
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने साकारलेल्या भक्तिसेवा विद्यापीठ शाळेचा शंभर वर्षांचा उज्ज्वल इतिहास ‘कोरी पाटी’ या माहितीपटातून उलगडणार आहे.
शताब्दी वर्षानिमित्ताने शाळेच्या १९८२-८३ बॅचच्या विद्यार्थ्यांनी या माहिती पटाची निर्मिती केली असून त्याचे प्रदर्शन सोमवारी (दि. ३) होणार आहे, अशी माहिती लेखक, दिग्दर्शक, अभिनेते व माजी विद्यार्थी सागर तळाशीकर व ‘आसमा’चे अध्यक्ष संजय रणदिवे,यांनी दिली.
केशवराव भोसले नाट्यगृहात दुपारी चार वाजता शाहू छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी शाळेच्या माजी वयोवृद्ध शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
तळाशीकर म्हणाले,‘ राजर्षी शाहू महाराजांनी तोफखाने गुरुजी आणि दीक्षित गुरुजी यांच्याकडे शाळेची जबाबदारी सोपविली होती. शिक्षणासोबत अनौपचारिक गोष्टींमधून जगणं शिकविण्याची शिक्षणपद्धती ही विद्यापीठ हायस्कूलची ओळख आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात या शाळेच्या चौकात स्वातंत्र्यसंग्रामाची भाषणे घुमली आहेत. कस्तुरबा गांधींनी येथे १९२५ साली महिलांची सभा घेऊन मुलांना शाळेत पाठविण्याबाबत जागृती केली. मुलांसोबत मुलींना पोहण्याचे प्रशिक्षण देणे, महात्मा गांधीजींच्या हस्ते चरखा आश्रम, मुलांना औद्योगिक प्रशिक्षण, सहशिक्षण, बालविवाह रोखण्यासाठी मुलांना २१ वर्षापर्यंत ब्रह्मचर्याची शपथ देणे, स्वातंत्र्यसंग्रामातील लढवय्यांसोबत विद्यार्थ्यांना संवाद साधता यावा यासाठी तपोवनच्या माळावर कार्यक्रम घेणे, पर्यावरणाचे महत्त्व जाणून प्रत्येकाने एक रोप लावण्याचा नियम अशा अनेक क्रांतिकारी व पुरोगामी विचारांची बीजे येथे रोवली गेली.
साथीच्या रोगात शाहू महाराजांनी पुरविलेली औषधे गावागावांत पोहोचविण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी सारा जिल्हा पिंजून काढला होता. विद्यापीठ हायस्कूलचा हा इतिहास नव्या पिढीपुढे यावा यासाठी १९८२-८३ च्या बॅचमधील कलासक्त विद्यार्थ्यांनी एकत्र येत माहितीपट बनवण्याची संकल्पना मांडली. त्यावर गेल्या दोन वर्षांपासून काम सुरू होते.
या माहितीपटासाठी जुने दस्तऐवज, फोटो संकलित करून त्यातून संहिता लिहिण्यात आली. तसेच शाळेतील जुने शिक्षक, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्यात आला. जवळपास ४७ तासांच्या चित्रीकरणातून ७५ मिनिटांचा हा माहितीपट बनला आहे.
यासाठी संशोधन, लेखन, दिग्दर्शन यांची जबाबदारी सागर तळाशीकर यांनी पेलली आहे; तर माजी विद्यार्थी हरीश कुलकर्णी यांनी कॅमेरा; शेखर गुरव यांनी संकलन, ऐश्वर्य मालगावे यांनी संगीत, गायत्री पंडितराव यांनी संगीत संयोजन, सचिन जगताप यांनी बासरीवादन, केदार गुळवणी यांनी व्हायोलिनवादन, देवी लव्हेकर यांनी गायन; तर आदिती कुलकर्णी यांनी चित्ररेखाटन ही जबाबदारी पार पाडली आहे.