कोल्हापूर : विद्यापीठाला चांगली श्रेणी मिळेल
By admin | Published: September 23, 2014 12:33 AM2014-09-23T00:33:37+5:302014-09-23T00:46:07+5:30
एन. जे. पवार यांची माहिती : ‘नॅक’ची समिती आज येणार
कोल्हापूर : नॅशनल अॅक्रिडेशन अॅण्ड असेसमेंट कौन्सिलच्या (नॅक) तिसऱ्या फेरीतील मूल्यांकनात ‘अ’ श्रेणी मिळविण्याच्या उद्देशाने शिवाजी विद्यापीठाने तयारी केली आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या प्रत्येक घटकांनी केलेले प्रयत्न, घेतलेले कष्ट पाहता या मूल्यांकनात चांगली श्रेणी मिळेल. मूल्यांकनासाठी विद्यापीठाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी आज, सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
‘नॅक’ची समिती विद्यापीठात मूल्यांकनासाठी उद्या, मंगळवारपासून येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने केलेल्या तयारीची माहिती देताना कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, या मूल्यांकनात विद्यापीठाचा गेल्या वर्षांतील विविध क्षेत्रांतील कामगिरीचा लेखा-जोखा तपासण्यात येणार आहे. मूल्यांकनाच्या दुसऱ्या फेरीत समितीने शिफारशी, सूचना केल्या होत्या. त्यांची पूर्तता तसेच अभ्यासक्रम-पाठ्यक्रमांतील बदल, शिक्षणपद्धती, संशोधन आणि सल्ला, प्रशासन, विद्यार्थ्यांचा विकास, चांगले उपक्रम राबविणे, नावीन्य या निकषांच्या आधारे मूल्यांकनाची विद्यापीठाने तयारी केली आहे. पाहणीसाठी अधिविभाग, प्रशासनातील विविध विभागांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळची तयारी पाहता आम्हाला ‘अ’ श्रेणी मिळेल, अशी अपेक्षा आहे. पत्रकार परिषदेस प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, ‘नॅक’चे समन्वयक डॉ. व्ही. बी. जुगळे, वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागप्रमुख डॉ. व्ही. एन. शिंदे, मास कम्युनिकेशनच्या समन्वयक डॉ. निशा पवार उपस्थित होत्या.
तयारी वेगाने...
विद्यापीठाचे मूल्यांकन बुधवार (दि. २४) ते शनिवार (दि. २७) या कालावधीत ‘नॅक’ समिती करणार आहे. त्यासाठी सात सदस्यीय समिती उद्या, मंगळवारी कोल्हापुरात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील विविध विभागांमध्ये आज युद्धपातळीवर तयारी सुरू होती. कॅम्पस्मध्ये रंगरंगोटी, विभागांमध्ये स्वच्छता आदी स्वरूपांतील कामे वेगाने सुरू होती. दुपारी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी विविध विभागांच्या प्रमुखांची सिनेट सभागृहात बैठक घेतली. त्यात त्यांनी आपआपल्या विभागांमधील सोयी-सुविधांबाबत, ‘नॅक’ समितीला सामोरे जाण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या.