कोल्हापूर : न्यायालय उठेपर्यंत दोनशे पालकांना शिक्षा, महिन्याभरातील कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 04:30 PM2018-05-14T16:30:58+5:302018-05-14T16:30:58+5:30
अज्ञान मुलांची हौस पुरविण्यासाठी त्यांच्या हाती दिलेली मोटारसायकल पालकांना चांगलीच महागात पडली आहे. गेल्या महिन्याभरात सुमारे दोनशे पालकांना सत्र न्यायालयाने कामकाज पूर्ण होईपर्यंत उभे राहण्याची शिक्षा देऊन प्रत्येकी दीड हजार दंडाप्रमाणे तीन लाख रुपये वसूल केले. तसेच पुन्हा लहान मुलांच्या हाती दुचाकी दिल्यास शिक्षा देण्याचा इशाराही न्यायालयाने दिला आहे.
कोल्हापूर : अज्ञान मुलांची हौस पुरविण्यासाठी त्यांच्या हाती दिलेली मोटारसायकल पालकांना चांगलीच महागात पडली आहे. गेल्या महिन्याभरात सुमारे दोनशे पालकांना सत्र न्यायालयाने कामकाज पूर्ण होईपर्यंत उभे राहण्याची शिक्षा देऊन प्रत्येकी दीड हजार दंडाप्रमाणे तीन लाख रुपये वसूल केले. तसेच पुन्हा लहान मुलांच्या हाती दुचाकी दिल्यास शिक्षा देण्याचा इशाराही न्यायालयाने दिला आहे.
दरम्यान रविवारी दिवसभरात तीस अल्पवयीन मुलांना शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहन चालविताना पकडले. त्यांच्या पालकांना सोमवारी न्यायालयात हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली.
अल्पवयीन तरुण ‘धूम स्टाईल’ने बेशिस्तपणे वाहने चालविताना दिसतात. मोटारसायकलवर तिब्बल सीट बसून काही शाळकरी मुले, मुली भरधाव जाताना दिसत आहेत. त्यांना वाहन चालविण्याचे नियम माहीत नसतात. अविचारी बुद्धीने वाहन चालवित असताना अपघाताला सामोरे जावे लागते.
महिन्याभरात राबविलेल्या ‘ट्रॅफिक ड्राईव्ह’ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर दोनशे पालकांना आपल्या अल्पवयीन मुलाला वाहन चालविण्यास दिल्याने शिक्षा भोगावी लागली आहे. शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी १८ वर्षांखालील दोनशे मुलांना दुचाकी चालविताना पकडून त्यांच्या पालकांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली होती.
रविवारी दिवसभरात तीस अल्पवयीन मुलांना पकडून त्यांच्या दुचाकीही जप्त करून घेतल्या आहेत. त्यांच्या पालकांना आज, सोमवारी न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. पोलिसांच्या या पुन्हा सुरू झालेल्या कारवाईमुळे पालकांचे धाबे दणाणले आहेत.