कोल्हापूर : तिसऱ्या बालचित्रपट महोत्सवाच्या लोगोचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 07:40 PM2018-02-09T19:40:39+5:302018-02-09T19:43:35+5:30
कोल्हापूर येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या तिसऱ्या बालचित्रपट महोत्सवाच्या लोगोचे अनावरण महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी विश्वास सुतार यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये झालेल्या महानगरपालिकेतील शाळेतील मुख्याध्यापकांच्या बैठकीत या लोगोचे अनावरण करण्यात आले.
कोल्हापूर : येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या तिसऱ्या बालचित्रपट महोत्सवाच्या लोगोचे अनावरण महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी विश्वास सुतार यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये झालेल्या महानगरपालिकेतील शाळेतील मुख्याध्यापकांच्या बैठकीत या लोगोचे अनावरण करण्यात आले. सलग दोन दिवस शाहू स्मारक भवनात रंगणाऱ्या या महोत्सवात सहा जागतिक चित्रपट मोफत दाखविले जाणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या सिनेमाच्या जाणीवा विकसित व्हाव्यात या हेतूने सहा वर्षापूर्वी सुरु झालेली चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीमार्फत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी शाहू स्मारक भवन येथे मोफत बालचित्रपट चित्रपट दाखविले जातात. जिल्ह्यात आणि जिल्हाबाहेर ही चळवळ आता उभारत आहे.
शिवाजी मराठा हायस्कूल येथे झालेल्या महानगरपालिकेतील शाळांच्या मुख्याध्यापकांच्या बैठकीत चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीचे समन्वयक मिलिंद यादव यांनी चिल्लर पार्टीची संकल्पना सांगितली. या बैठकीत सर्व महानगरपालिकेतील शाळांचे विद्यार्थी सहभागी करण्याबाबत यावेळी यादव यांनी केलेल्या आवाहनाला सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला.
महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी विश्वास सुतार यांनी यावेळी चिल्लर पार्टीला देणगी दिली. त्यांच्या हस्ते पतंग उडविणाऱ्या मुलीचे छायाचित्र असलेल्या तिसऱ्या बालचित्रपट महोत्सवाच्या लोगोचे अनावरण याप्रसंगी करण्यात आले. यावेळी चंद्रशेखर तुदीगाल, ओंकार कांबळे, निलेश झेंंडे, रसूल पाटील, सचिन पांडव, नचिकेत सरनाईक , संजय शिंदे , सुधाकर सावंत , आदी उपस्थित होते.
झोपडपट्टीतील आणि महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत चित्रपट हे माध्यम पोहोचविण्याचा यंदा चिल्लर पार्टीचा हेतू आहे. या संकल्पनेला महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पाठिंबा दिल्यामुळे यंदा केवळ महानगरपालिकेतील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यंदाचा बालचित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येत आहे.