कोल्हापूर : मामाच्या गावात सुट्टीची धम्माल, शालेय मुला-मुलींची निघाली निसर्ग सहल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 04:31 PM2018-11-10T16:31:07+5:302018-11-10T16:35:39+5:30
मामाच्या गावाला जाउया म्हणत, कोल्हापूर जिल्ह्यातील १00 शालेय मुला-मुलींनी शनिवारी सुट्टीची धम्माल केली. या निसर्ग सहलीत वारसास्थळांच्या दर्शनासह ग्रामीण जीवन आणि पारंपारिक खेळ मुले अनुभवत आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूरातून या दोनदिवसीय सहलीला प्रारंभ झाला.
कोल्हापूर : मामाच्या गावाला जाउया म्हणत, कोल्हापूर जिल्ह्यातील १00 शालेय मुला-मुलींनी शनिवारी सुट्टीची धम्माल केली. या निसर्ग सहलीत वारसास्थळांच्या दर्शनासह ग्रामीण जीवन आणि पारंपारिक खेळ मुले अनुभवत आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूरातून या दोनदिवसीय सहलीला प्रारंभ झाला.
हिलरायडर्स फौंडेशन, संवेदना सोशल फौंडेशन आणि कुतुहल फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रोत्साहनातून ११ ते १४ वयोगटातील मुला-मुलींसाठी ही मोफत सहल आयोजित करण्यात आली आहे.
मोबाईल, टीव्हीच्या जोखडातून मुलांची सोडवणूक करण्याच्या उद्देश्याने सुट्टीची धम्माल, मामाच्या गावाला जाऊया, आठवणीतील खेळ ही या सहलीची संकल्पना आहे. सहभागी मुला-मुलींशी गप्पा मारल्यानंतर विटी दांडू खेळून चंद्रकांत पाटील यांनी येथील हुतात्मा पार्कमधून या सहलीचा प्रारंभ केला. सहलीसाठी जाणाऱ्या दोन्ही गाडयांना पाटील यांनी श्रीफळ वाढवून सुरुवात केली.
कार्यक्रमासाठी संवेदना सोशल फौंडेशनचे अध्यक्ष राहुल चिक्कोडे, हिलरायडर्स फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद पाटील, कुतुहल फौंडेशनचे अध्यक्ष सचिन जिल्हेदार तसेच निसर्ग मित्र संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले, समिट अॅडव्हेंचर्सचे विनोद कांबोज आणि सुरज ढोली (गुरव) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी गेल्या चार वर्षात विविध नाविण्यपूर्ण उपक्रम आयोजनावर भर दिला असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, माणसांच्या पोटाच्या भुकेबरोबरच मन आणि बुध्दीची भूक भागविण्याच्या उद्देशाने या नाविण्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
मुलांनी सकाळी हुतात्मा पार्क येथे शाहूकालीन माहिती घेतली. शाहुकालीन साठमारी, राज्यातील सर्वात उंच आणि देशातील दुसºया क्रमांकाचा ३0३ फुट उंचीचा तिरंगा ध्वज, पोलीस गार्डन येथे शस्त्रास्त्रांची पाहणी केल्यानंतर मुलांनी ऐतिहासिक शाहु जन्मस्थळास भेट दिली. टाऊन हॉल उद्यानातील कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाची पाहणी करुन बागेतच दुपारचे भोजन घेतले.
दुपारनंतर आसुर्ले-पोर्ले येथील गुऱ्हाळघर आणि शेतशिवाराची पाहणी करुन मुलांनी सायंकाळी पन्हाळगडावर ताराराणीच्या राजवाड्यात मुक्काम केला. येथे पारंपारिक खेळ खेळुन रात्री टेलिस्कोपद्वारे कुतूहल फौंडेशनचे आनंद आगळगावकर यांनी आकाश निरिक्षण घडविले. मुला-मुलींच्या या दोन दिवसांच्या मोफत सहलीची अनिल चौगुले यांनी माहिती दिली.
पन्हाळगडावर रविवारी पक्षीनिरिक्षण, खेळ
रविवारी सकाळी पन्हाळा येथे पक्षीनिरिक्षण, गडदर्शन, निसर्गदर्शनानंतर विठीदांडू, लगोरी, गोटया अशा अनेक पारंपारिक तसेच निसर्ग खेळांचा अनुभव मुले घेणार आहेत. त्यानंतर कोल्हापूरातील हुतात्मा पार्क येथे या ऐतिहासिक सहलीचा समारोप होईल. या उपक्रमांतर्गत आता १२, १४, १६, १८ आणि २0 नोव्हेंबर २0१८ अशा सहा सहली होणार आहेत.