कोल्हापुरात दुपारीच लस संपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:23 AM2021-04-18T04:23:25+5:302021-04-18T04:23:25+5:30
कोल्हापूर : कोल्हापुरात लसींचा तुटवडा शनिवारीही कायम राहिला. लस नसल्याने ५० केंद्रे बंदच ठेवावी लागली; तर उर्वरित ठिकाणी दुपारीच ...
कोल्हापूर : कोल्हापुरात लसींचा तुटवडा शनिवारीही कायम राहिला. लस नसल्याने ५० केंद्रे बंदच ठेवावी लागली; तर उर्वरित ठिकाणी दुपारीच लस संपल्याने केंद्रे बंद करावी लागली. आणखी ३६ हजार लस आणण्यासाठी दुपारीच वाहने पुण्याकडे रवाना झाली.
जिल्ह्यात साडेतीनशे केंद्रांवर कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. सुरुवातीला लस घ्या म्हणून विनंती करावी लागत होती, पण जसजसा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला तशा लसीकरणासाठी रांगा वाढू लागल्या. केंद्रे व लसींचा पुरवठाही वाढवावा लागला; पण मागणी वाढल्यानंतर पुण्यातून लसींचा पुरवठाच थांबला आहे. परिणामी पुरवून पुरवून लस वापरावी लागली.
गेल्या आठवडाभरापासून लसीच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्याला आठ दिवसांसाठी २ लाख ८० हजार लस लागते. पण एवढ्या प्रमाणात ती मिळत नसल्याने केंद्रे बंद करण्याची वेळ आली आहे. शनिवारी ही शिल्लक असलेली लसही संपली. कोल्हापूर शहरातील बहुतांशी नागरी केंद्रे बंद राहिली. केवळ सेवा रुग्णालयात लसीकरण सुरू असल्याने नागरिकांनी तेथे मोठी गर्दी केली होती. लांबच लांब रांग केंद्राबाहेर लागली होती.
दरम्यान, ३६ हजार लसींचे डोस उपलब्ध झाल्याचे कळल्यानंतर आरोग्य विभागाने पुण्याला लस आणण्यासाठी वाहन पाठवून दिले आहे. आज रविवारी सकाळी त्याचे लगेच वितरण होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा टंचाई कायम राहणार असल्याने लस मिळत नाही तोवर बऱ्यापैकी केंद्रे बंदच राहणार आहेत.