कोल्हापूर : लसीकरण नाकारणे पडले महागात, जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 06:05 PM2018-11-30T18:05:49+5:302018-11-30T18:07:58+5:30
जनावरांसाठी लाळखुरकतची लस टोचून घेण्यास नकार देणे पशुपालकांना चांगलेच महागात पडले आहे. लस न दिल्याने गेल्या पंधरा दिवसांत जवळपास १३ जनावरे दगावली असल्याचे समोर आले आहे. शासनाकडून कोणताही लाभ मिळत नसल्याने पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या लसीबाबत गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोल्हापूर : जनावरांसाठी लाळखुरकतची लस टोचून घेण्यास नकार देणे पशुपालकांना चांगलेच महागात पडले आहे. लस न दिल्याने गेल्या पंधरा दिवसांत जवळपास १३ जनावरे दगावली असल्याचे समोर आले आहे. शासनाकडून कोणताही लाभ मिळत नसल्याने पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या लसीबाबत गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात लाळखुरकत आजाराने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. याच्या प्रतिबंधासाठी जिल्हा परिषदेने नुकतीच लसीकरण प्रक्रिया पूर्ण केली आहे. २९ पशुधन विकास अधिकारी, १९ सहायक पशुधन अधिकारी, ७२ पर्यवेक्षक, ‘गोकुळ’चे १५० डॉक्टर, कृत्रिम रेतन केंद्रावरील ३६ जण यासह खासगी प्रॅक्टिस करणारे पशुवैद्यक यांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेने लाळखुरकत प्रतिबंध लसीकरण पूर्ण केले आहे. ८ लाख लसींचे ६ लाख २५ हजार ७०३ जनावरांना लसीकरण पूर्ण केले आहे. यात १ लाख ९५ हजार १३६ गाई, तर ४ लाख ३० हजार ५६७ म्हशींचा समावेश आहे.
परजिल्ह्यांतून येणाऱ्या ऊसतोडणी मजुरांच्या जनावरांमध्ये या आजारांची जास्त लक्षणे दिसत असल्याने कारखान्याच्या गाडीअड्ड्यावर जाऊन लसीकरण केले आहे.
तथापि स्थानिक पातळीवर मात्र ही लस टोचून घेण्याबाबत पशुपालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरसमज असल्याने बऱ्याच जणांनी ती टोचून घेतलेली नाही. सध्या जी जनावरे दगावली आहेत, त्यांना ही लस टोचली गेली नसल्याचे पशुसंवर्धन विभागाने केलेल्या पाहणीतून स्पष्ट झाले आहे. आजच्या घडीला एका जनावराची किंमत किमान ५० हजार आहे. केवळ गैरसमजुतीने लसीकरण न करून घेतल्याने पशुपालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
लसीकरणाबाबत गैरसमज
- सरकारी लस नको, खासगीच हवी
- लस टोचल्यास जनावरांना ताप येतो.
- जनावरे तीन दिवस दूध देत नाहीत.
- जनावरांच्या कासेला गाठी होतात.
पंधरा दिवसांत तेरा जनावरे दगावली
जिल्ह्यात गेल्या १५ दिवसात १३ जनावरे दगावली आहे. यात माणगावातील तीन, नागदेववाडी तीन, कंदलगाव चार, करनूर तीन अशी मृत झालेली जनावरे आहेत. या जनावरांना लस देण्यात पशुपालकांनीच नकार दिला असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
लाभ मिळण्यात अडचणी
कोणत्याही आजाराने जनावर दगावले तर त्याची जबाबदारी पशुसंवर्धन विभाग घेत नाही. जिल्हा परिषदेकडून गोठा जळून जनावरे दगावली तर प्रती जनावर १० हजार रुपये मिळतात; पण आजारासाठी पैसे मिळत नाहीत. खासगी दूध संघाचा विमा असेल तर मात्र एका जनावराला किमान २० हजार रुपये तरी मिळतात. लाभ मिळण्याची प्रक्रिया अवघड असल्याने त्याच्या मागे लागण्यापेक्षा लसीकरणासाठी आग्रह धरण्याची गरज आहे.
आम्ही घरोघरी जाऊन लसीकरणासाठी आवाहन केले तरीही पशुपालक लसीकरणास सहकार्य करीत नव्हते. अचानक थंडी वाढल्याने जनावरांना ताप येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातून त्यांना न्यूमोनियाही होत आहे. जनावरांना उबदार जागेत बांधण्यासह त्यांना गारवा लागणार नाही, याची खबरदारी घेण्याची गरज आहे.
- डॉ. संजय शिंदे,
जिल्हा पशुधन विकास अधिकारी, कोल्हापूर