कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाचे होणार फेरसर्वेक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 12:17 PM2023-05-06T12:17:24+5:302023-05-06T12:18:03+5:30
मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक नरेश लल्लन यांनी केली कोल्हापूर रेल्वेस्थानकाची पाहणी, अमृत भारत योजनेअंतर्गत स्थानकाचा लूक बदलणार
कोल्हापूर : मंजूर होऊनही रखडलेल्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाच्या कामासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. या मार्गाचे पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक नरेश लल्लन यांनी शुक्रवारी (दि. ५) दिली.
लल्लन हे शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी कोल्हापूर रेल्वेस्थानकाची पाहणी करीत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचनाही केल्या. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाला २०१६-१७ मध्ये तत्कालीन रेल्वमंत्री सुरेश प्रभू यांनी मंजुरी दिली होती; मात्र त्यानंतर पुढे काहीच झाले नाही.
१०७ किलोमीटरच्या या मार्गाचे याआधीही सर्वेक्षण झाले आहे; मात्र या मार्गावर अनेक ठिकाणी घाट असल्याने उतार जास्त आहेत. हे उतार कमी करण्यासाठी फेरसर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यासाठीची निविदा लवकरच काढण्यात येणार असल्याचे लल्लन यांनी सांगितले. यावेळी रेल्वेच्या पुणे विभागीय प्रबंधक इंदू दुबे, स्वप्नील नीला, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी, जयेश ओस्वाल उपस्थित होते.
रेल्वेस्थानकाचा लूक बदलणार
अमृत भारत योजनेअंतर्गत कोल्हापूर रेल्वेस्थानकाचाही लूक बदलण्यात येणार आहे. यामध्ये स्थानकवर अत्याधुनिक पद्धतीचा १२ मीटर लांबीचा ब्रीज उभारण्यात येणार आहे. तीन ठिकाणी एक्सलेटर लिफ्ट, आवश्यक ठिकाणी स्वच्छतागृहे, फर्निचर, चार नंबर फलाटावर शेड उभारण्यात येणार आहे. एका वर्षात ही कामे पूर्ण करायची आहेत. यासाठी स्थानकावरील कोणत्या ठिकाणी कोणत्या सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत, याची माहितीही लल्लन यांनी घेतली.
पादचारी पूलही होणार
परीख पुलाच्या अलीकडील मार्ग बंद केल्याने राजारामपुरीतून मध्यवर्ती बसस्थानकाकडे येणाऱ्या नागरिकांना धोकादायक परीख पुलाखालूनच यावे लागते. यासाठी येथे पादचारी पूल उभारण्याबाबतही रेल्वे प्रशासनाने सकारात्मकता दर्शविली आहे.