कोल्हापूर : आवक घसरल्याने भाजीपाला वधारला, फळांच्या दरातही वाढ; पण ‘हापूस’ आवाक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:34 AM2018-05-28T11:34:16+5:302018-05-28T11:34:16+5:30
खरीप पेरणीसाठी जमिनी मोकळ्या करण्यास सुरुवात झाल्याने भाजीपाल्याची आवक हळूहळू कमी होऊ लागली असून, परिणामी गत आठवड्याच्या तुलनेत दर वधारलेले दिसतात. फळबाजारामध्ये काहीशी तेजी दिसत आहे; पण हापूस आंब्यांच्या दरात घसरण झाली असून, किरकोळ बाजारात १०० रुपये प्रतिडझनापर्यंत आंबा आला आहे.
कोल्हापूर : खरीप पेरणीसाठी जमिनी मोकळ्या करण्यास सुरुवात झाल्याने भाजीपाल्याची आवक हळूहळू कमी होऊ लागली असून, परिणामी गत आठवड्याच्या तुलनेत दर वधारलेले दिसतात. फळबाजारामध्ये काहीशी तेजी दिसत आहे; पण हापूस आंब्यांच्या दरात घसरण झाली असून, किरकोळ बाजारात १०० रुपये प्रतिडझनापर्यंत आंबा आला आहे. पावसाळ्याची बेगमी करण्यासाठी कडधान्य बाजारामधील खरेदीची लगबग अजूनही कायम आहे.
कोल्हापूर बाजारात सांगली, बेळगावसह स्थानिक भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात असते. शेतकऱ्यांकडून भाजीपाला काढून खरीप पेरणीसाठी जमिनी मोकळ्या केल्या जात आहेत. स्थानिक भाजीपाला कमी झाल्याने दरात वाढ होत असून, किरकोळ बाजारात साधारणत: किलोमागे दरात पाच रुपयांची वाढ झाल्याची दिसते.
वांगी, ढबू, गवार, कारली, भेंडी, दोडका या फळभाज्यांच्या दरात किलोमागे पाच ते सात रुपयांची वाढ झाली आहे. फळभाज्यांमध्ये बिनीसचा दर सर्वांत चढा असून घाऊक बाजारात तो ७५ रुपये किलो आहे. कोथिंबिरीचा हंगाम सुरू झाल्याने आवक थोडी वाढली आहे.
बाजार समितीत रोज २५ हजारांहून अधिक पेंढ्यांची आवक होत आहे. त्यामुळे गत आठवड्यापेक्षा पेंढीमागे चार ते पाच रुपयांची घसरण झालेली दिसते. मेथी, पोकळा, पालक या पालेभाज्यांची आवक एकदम कमी झाल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात पेंढीचा दर १० ते १५ रुपये आहे.
फळबाजारात मोसंबी, संत्री, चिक्कू, सफरचंद या फळांची आवक मर्यादित असल्याने दर अजूनही तेजीत आहेत; पण हापूस आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कोकण, चेन्नई (मद्रास), कर्नाटकातून अजूनही आवक चांगली असल्याने ‘हापूस’ सामान्यांच्या आवाक्यात आला आहे.
किरकोळ बाजारात किमान १००, तर कमाल २०० रुपये दर राहिला आहे. लालबागच्या आंब्याचे दरही खाली आले असून, तो ३० रुपये डझन आहे. तोतापुरीची आवक स्थिर असली तरी लहान तोतापुरी आंबा पंधरा रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.
पावसाळ्याची बेगमी करण्यासाठी कडधान्य खरेदीची लगबग अजूनही बाजारात दिसत आहे. तूरडाळ, मूगडाळीचे दर ६५ रुपये, तर हरभराडाळ ५० रुपये किलोपर्यंत आहे. साखरेचे दर काहीसे स्थिर झाले असून किरकोळ बाजारात ३२ रुपये दर आहे. सरकी तेल, शेंगदाणा, रवा, मैद्याच्या दरांत फारसा चढउतार दिसत नाही.
कांदा-बटाटा स्थिर
कांदा-बटाट्याची आवक स्थिर असल्याने दरात चढउतार झालेला नाही. घाऊक बाजारात कांदा सरासरी साडेसहा रुपये, तर बटाट्याचा प्रतिकिलो १७ रुपये दर आहे.
फणसाची आवक सुरू
आंबे, करवंदे, चिकन्या या रानमेव्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. आता फणसाची आवक सुरू झाली असून, किरकोळ बाजारात ‘काफा’ फणसाचा ७० ते ८० रुपये दर आहे.