कोल्हापूर : भाजी उतरली, फळबाजार घसरला, लसूण २० रुपये किलो; पपईची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 10:50 AM2018-09-17T10:50:59+5:302018-09-17T10:57:38+5:30
गेल्या आठवड्यात असणाऱ्या भाजीपाल्याच्या दरांत उतरण झाली, तसेच फळबाजारही घसरला. लसणाचे दर उतरल्याने तो २० रुपये किलो झाला आहे; परंतु रविवारच्या आठवडी बाजारात नागरिकांची गर्दी कमी होती.
कोल्हापूर : गेल्या आठवड्यात असणाऱ्या भाजीपाल्याच्या दरांत उतरण झाली, तसेच फळबाजारही घसरला. लसणाचे दर उतरल्याने तो २० रुपये किलो झाला आहे; परंतु रविवारच्या आठवडी बाजारात नागरिकांची गर्दी कमी होती.
या आठवड्यात बाजारात भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्याचा परिणाम दरावर होऊन दरात घसरण झाली आहे; पण ओला वाटाणा, श्रावण घेवडा, आले, पडवळ, मुळा, शेवग्याची शेंग, बीट, कांदापात, तोंदली, शेपू व पिक ॅडोरमध्ये वाढ झाली आहे.
कोबीचा गड्डा तीन रुपये, वांगी, कारली, दोडका, घेवडा २० रुपये किलो, टोमॅटो सहा रुपये, ओली मिरची १५ रुपये, ढबू मिरची १५ रुपये, गवार, वाल २५ रुपये, मेथी, शेपू पाच रुपये पेंढी असा दर झाला आहे. दुधी भोपळा, गाजर व भेंडीचा दर ‘जैसे थे’ होता. याचबरोबर कांदादरात वाढ झाली आहे. कांद्याचा दर प्रतिकिलो दहा रुपये, तर बटाट्याचा दर स्थिर असून तो २० रुपये किलो आहे.
तसेच फळांच्या दरांत घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात असलेला फळांचा दर उतरला आहे. मोसंबीचे चुमडे, संत्र्यांचा बॉक्स ६०० रुपये, चिक्कू ३०० रुपये शेकडा, सीताफळ ६० ते ७० रुपये किलो, बोरे २० रुपये किलो; तर सफरचंद-इंडियन, केळी यांचे दर स्थिर आहेत. सफरचंद ४० रुपये किलो होते.
सुका मेव्यामध्ये काजू ८५० रुपये, बदाम ८०० रुपये, बेदाणे ३२० ते ४००; तर शेंगदाणे ९० ते १०० रुपये, सरकी तेल ९०, शेंगतेल १२५ ते १३० रुपये, तांदूळ ४४ ते ६० रुपयांपर्यंत प्रतिकिलो, गहू २८ रुपयांपासून ते ३४ रुपयांपर्यंत, ज्वारी २२ ते २८ रुपये, शाळू ३२ ते ४० रुपये, हरभरा ६० ते ६४ रुपये, तूरडाळ ६४ ते ७२ रुपये, शाबू ६० ते ६४ रुपये, कांदापोहे ४८ ते ५० रुपये, रवा ३२ रुपये, मैदा ३० रुपये, साखर ३६ ते ३८ रुपये असा दर होता.
पपईचा ढीग
आठवडी बाजारात पपईची आवक मोठ्या प्रमाणात आली आहे. त्यामुळे पपईचे ढीग लागले होते. एक पपई ३० रुपये, तर दोन ५० रुपये असा दर होता. ते घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होती.
भुईमूग शेंग उतरली; मागणी वाढली
गेल्या तीन महिन्यांपासून ओल्या भुईमुगाच्या शेंगांच्या दरात सातत्याने वाढ होत होती; पण सध्या या शेंगांचा दर उतरला आहे. तो २० ते २५ रुपये किलो असा आहे. त्यामुळे ग्राहकांकडून ओल्या शेंगेला मागणी वाढली होती.