कॅन्सरवरील उपचारांसाठी कोल्हापूरच भारी

By Admin | Published: February 4, 2015 12:21 AM2015-02-04T00:21:00+5:302015-02-04T00:41:39+5:30

रुग्णांना दिलासा : मुंबई, पुण्याकडील धावपळ वाचली; अद्ययावत उपचार पद्धती उपलब्ध

Kolhapur is very heavy for the treatment of cancer | कॅन्सरवरील उपचारांसाठी कोल्हापूरच भारी

कॅन्सरवरील उपचारांसाठी कोल्हापूरच भारी

googlenewsNext

संतोष मिठारी - कोल्हापूर  -चाळीस वर्षांपूर्वी एखाद्याचे ‘कॅन्सर’चे निदान झाले की, त्याला कोल्हापुरातून मिरज अथवा मुंबई, पुण्याला जाण्याचा सल्ला दिला जायचा. याठिकाणी जाण्याचा सल्ला म्हणजे रुग्णाची स्थिती बिकट असल्याचे कुटुंबीय, नातेवाइकांकडून समजण्यात येत होते. मात्र, आता हे चित्र बदलले आहे. मुंबई, पुण्यासह देशातील मोठ्या हॉस्पिटलच्या तुलनेत कॅन्सरवरील उपचारासाठी कोल्हापूर भारी ठरत आहे. रेडिएशन, केमोथेरपीसह बिनटाक्यांची शस्त्रक्रिया, आदी सुविधा उपलब्ध आहेत. गेल्या दहा वर्षांत येथील उपचारपद्धती टप्प्याटप्प्याने बदलली आहे.
कोल्हापुरात साधारणत: १९९५ पासून कॅन्सरवर शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध झाली; पण त्यानंतर त्याच्या पुढे या क्षेत्रात पाऊल पडले नाही. त्यामुळे येथील रुग्णांना मिरज, मुंबई, पुणे, आदी शहरांमध्ये उपचारांसाठी जावे लागत होते. या ठिकाणी उपचार, राहणे, आदींचा खर्च तसेच हॉस्पिटलमधील वेटिंग लिस्ट आणि व्यावसायिक वृत्तीमुळे रुग्णांचा वेळ, पैसा अधिक खर्च व्हायचा. शिवाय उपचारांना विलंब झाल्याने आजार बळावत होता. ते लक्षात घेऊन कोल्हापुरातील काही डॉक्टरांनी कॅन्सरवरील शस्त्रक्रियेसह अन्य उपचार पद्धतीची सुरुवात गेल्या दहा वर्षांपूर्वी केली. सध्या या ठिकाणी आठ कॅन्सर सर्जन असून, एक अद्ययावत कॅन्सर सेंटर कार्यरत आहे. येथे रेडिऐशन, केमोथेरपी, बिनटाक्याची शस्त्रक्रिया, ट्युमरचा अचूक अभ्यास करणारी ओंको पॅथॉलॉजी, मेजर व सुपरामेजर सर्जरीची तसेच अचूक रेडिऐशन करणाऱ्या यंत्रसामग्रीची सुविधा उपलब्ध आहे. त्याद्वारे मुंबई, पुण्यासह देशातील मोठ्या हॉस्पिटलसारखे उपचार मिळत आहेत. यामुळे रुग्णांचा वेळ, पैशांची बचत होऊन त्यांच्यावर वेळेवर उपचार होत आहे. अद्ययावत आणि बदललेली उपचार पद्धती कोल्हापूरसह सांगली, सातारा, हुबळी, आदी परिसरांतील रुग्णांना दिलासा देणारी ठरली आहे.
तोंड, अन्ननलिका, स्तन, पचनसंस्था, मूत्राशय अशा सर्व प्रकारच्या कॅन्सरवर कोल्हापुरात उपचार केले जातात. मेजर सर्जरीसाठी साधारणत: ३५ ते ५० हजार, तर सुपरामेजर सर्जरीसाठी एक लाखापर्यंत उपचारांचा खर्च होतो. अन्य शहरांतील तुलनेत हा खर्च ५० टक्क्यांपर्यंत आहे. उपचारांचा खर्च याठिकाणी कमी येत असल्याने कोल्हापूरसह औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, कोकण, गोवा, कर्नाटकातील हुबळीपर्यंतचे रुग्ण येथे येतात. एकंदरीतच कोल्हापुरात आता कॅन्सरवर अत्याधुनिक उपचार होणे शक्य आहे.

‘पेट सीटी’ ची कमतरता...
कॅन्सरचा टप्पा अचूकपणे ओळखता येणारी ‘पेट सीटी होल बॉडी स्कॅन’ आणि रक्ताच्या कॅन्सरच्या स्वतंत्र विभागाची कोल्हापुरात कमतरता आहे. काही डॉक्टर, हॉस्पिटल या सुविधा सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
कॅन्सरवरील उपचारपद्धतीत कोल्हापूर हे मुंबई, पुण्यासह देशातील विविध हॉस्पिटल्स्च्या बरोबरीने आहे. कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये गेल्यावर्षी राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत चार हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले. कोल्हापूरच्या रुग्णांना कॅन्सरबाबतच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबई, पुणे आता गाठावे लागत नाही. अन्य शहरांच्या तुलनेत कोल्हापुरात उपचारांचा खर्च कमी आहे. त्यामुळे येथे उपचारांसाठी राज्यातून रुग्ण येत आहेत.
- डॉ. सूरज पवार (कॅन्सर सर्जन)

Web Title: Kolhapur is very heavy for the treatment of cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.