कोल्हापूर : कुलगुरूंना मिळेल आता शिवाजी विद्यापीठासाठी वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 04:07 PM2018-04-30T16:07:21+5:302018-04-30T16:07:21+5:30
मुंबई विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळाल्यामुळे आता शिवाजी विद्यापीठाच्या कामकाजासाठी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना वेळ देता येईल. त्यामुळे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यासह विविध उपक्रमांना गती मिळेल, अशी अपेक्षा विद्यापीठातील घटकांतून व्यक्त होत आहे.
संतोष मिठारी
कोल्हापूर : मुंबई विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळाल्यामुळे आता शिवाजी विद्यापीठाच्या कामकाजासाठी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना वेळ देता येईल. त्यामुळे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यासह विविध उपक्रमांना गती मिळेल, अशी अपेक्षा विद्यापीठातील घटकांतून व्यक्त होत आहे.
जुलै २०१७ मध्ये मुंबई विद्यापीठातील उत्तरपत्रिका तपासणीच्या कामासाठी मदत करण्याची सूचना कुलपती कार्यालयाने शिवाजी विद्यापीठाला केली. त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार कुलगुरू डॉ. शिंदे यांच्यावर कुलपती कार्यालयाने दि. ९ आॅगस्ट २०१७ रोजी सोपविला. यानंतर गेल्या आठ महिन्यांत मुंबई विद्यापीठातील कामकाजामध्ये कुलगुरू डॉ. शिंदे यांचा अधिकतर वेळ व्यतीत होऊ लागला.
एखादा कार्यक्रम, महत्त्वाच्या विषयांवरील बैठकीपुरतेच शिवाजी विद्यापीठात त्यांचे येणे होऊ लागले. त्याचा परिणाम विद्यापीठातील प्रशासकीय पातळीवरील कामकाजावर झाला. प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी संघटनांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून होणाऱ्या कार्यवाहीची गती मंदावली. त्यातच गेल्या महिन्यात जाहीर झालेल्या ‘नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क’ (एनआयआरएफ)च्या मानांकनामध्ये देशातील शंभर विद्यापीठांच्या यादीत शिवाजी विद्यापीठाला स्थान मिळविता आले नाही.
यावर हे मानांकन घसरण्यास कुलगुरू जबाबदार असल्याचा आरोप शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) केला. ‘नॅशनल स्टुडंट्स युनियन आॅफ इंडिया’च्या (एनएसयूआय) कोल्हापूर शाखेने ‘कुलगुरू हरवले’ अशा स्वरूपातील पत्रके विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावून निषेध व्यक्त केला.
कुलगुरूंच्या विद्यापीठातील अनुपस्थितीबाबत विविध घटक, संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. त्यातच कुलगुरू डॉ. शिंदे यांची मुुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड होण्याची चर्चा सुरू होती.
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुहास पेडणेकर यांची निवड झाल्याने या विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदाच्या जबाबदारीतून डॉ. शिंदे मुक्त होणार आहेत. त्यामुळे ते शिवाजी विद्यापीठातील कामकाज, विविध घटकांचे प्रलंबित प्रश्न, उपक्रमांना गती देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
‘एनआयआरएफ’, ‘नॅक’ची तयारी महत्त्वाची
शिवाजी विद्यापीठाने सन २०१४ मध्ये ‘अ’ मानांकन मिळविले. यानंतरच्या वर्षी ‘एनआयआरएफ’च्या मूल्यांकनात देशात २८ वा क्रमांक पटकविला. मात्र, यावर्षी ‘एनआयआरएफ’च्या मानांकनात पहिल्या शंभर संस्थांमध्ये विद्यापीठाला स्थान मिळविता आले नाही. विद्यापीठ एक वर्षानंतर ‘नॅक’च्या मूल्यांकनाला सामोरे जाणार आहे. त्यापूर्वी ‘एनआयआरएफ’चे मानांकन होईल. त्याची विद्यापीठाकडून आतापासून तयारी होणे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने कुलगुरूंकडून कार्यवाही होणे अपेक्षित आहे.
आव्हानात्मक स्थितीमध्ये मुंबई विद्यापीठाची जबाबदारी कुलपतींनी माझ्यावर सोपविली. शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण कामाच्या वारशामुळे मला ही संधी मिळाली. संवाद, संपर्क व सहभाग या त्रिसूत्रीने काम करून ही जबाबदारी यशस्वीपणे पार पडल्याचे मला समाधान आहे.
-डॉ. देवानंद शिंदे,
कुलगुरू
विद्यापीठाचे मानांकन ढासळले आहे. ते वाढविण्याच्या दृष्टीने कुलगुरूंनी आता अधिक जबाबदारीने आणि पूर्ण क्षमतेने काम करण्याची गरज आहे. प्रशासन आणि विविध अधिकार मंडळांच्या कामकाजामध्ये त्यांनी लक्ष द्यावे.
- सुधाकर मानकर,
मार्गदर्शक, ‘सुटा’