कोल्हापूर : झाडाला टांगुन दिला दोन बकऱ्यांचा बळी, भानामतीचा प्रकार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 06:33 PM2018-12-27T18:33:23+5:302018-12-27T18:35:50+5:30
बहिरेश्वर, कसबा बीड ( ता करवीर ) गांवाच्या हद्दीदरम्यानच्या कुरणात उंबराच्या झाडाला दोन बकºयांना लटकावून बळी देण्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. भानामतीसारख्या या प्रकारामुळे ग्रामीण भागात घबराटीचे वातावरण निर्माण झाले .
कोल्हापूर/सावरवाडी : बहिरेश्वर, कसबा बीड ( ता करवीर ) गांवाच्या हद्दीदरम्यानच्या कुरणात उंबराच्या झाडाला दोन बकऱ्यांना लटकावून बळी देण्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. भानामतीसारख्या या प्रकारामुळे ग्रामीण भागात घबराटीचे वातावरण निर्माण झाले .
घटनास्थानावरून प्राप्त माहिती नुसार बहिरेश्वर आणि कसबा बीड या दोन गावांच्या हद्दीमधून वाहणाऱ्या ओढ्यात गणपतराव वरुटे यांच्या विहारीनजीक उंबराचे झाड आहे.
दोन बकऱ्यांचे मागील पाय दोरीने बांधून झाडाच्या उत्तर बाजूस वीस फुटावरील फांदीला त्यांना लटकावून बळी देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या ओढ्याशेजारी असणाऱ्या आपल्या शेतीकडे गेलेल्या माजी सरपंच सुर्यकांत दिंडे यांना परिसरात सुटलेल्या दुर्गंधीमुळे हा प्रकार निर्दशनास आला.
उंबराच्या झाडाखाली लिंबू पडलेले होते. सुर्यकांत दिंडे यांनी पोलीस पाटील दतात्रय कुंभार आणि कसबा बीडचे पोलिस पाटील पंढरी ताशिलदार यांना घटनास्थळी बोलवून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. हा प्रकार चार ते पाच दिवसापूर्वी घडलेला असल्याची शक्यता वर्तवली असून बकरी कुजलेल्या अवस्थेत आढळले आहेत.
करवीर तालुक्यात पहिलाच प्रकार !
ग्रामीण भागात अजुनही अंधश्रद्धा आहे . उंबराच्या झाडावर बकऱ्यांचा बळी देण्याचा हा प्रकार करवीर तालुक्यात प्रथमच घडला आहे.
उंबराच्या झाडावर मूक प्राण्यांचा बळी देण्याचा प्रकार हा पौर्णिमेच्या रात्री घडलेला असण्याची शक्यता आहे. भानामतीच्या असल्या प्रकारामुळे प्राण्याचा बळी जातो. विज्ञान युगात भानामतीचे प्रकार हे निंदनिय आहेत.
सुर्यकांत दिंडे,
माजी सरपंच, बहिरेश्वर ( ता. करवीर )