कोल्हापूर : कचऱ्याचे ढीग हटवून बनविले विरंगुळा केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 04:49 PM2018-11-17T16:49:39+5:302018-11-17T16:51:23+5:30
स्वच्छ कोल्हापूर संकल्पनेचा निर्धार करून कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र साकारले आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस यांच्या पुढाकाराने उभारलेल्या या विरंगुळा केंद्राचा फायदा ज्येष्ठांसह पक्ष्यांनाही होत आहे. भविष्यात येथे ओपन जीम सुरू करण्यात येणार आहे. कचऱ्यांचे ढीग व दुर्गंधीयुक्त जागेचे रूपडेच या उपक्रमातून पालटले आहे.
कोल्हापूर : स्वच्छ कोल्हापूर संकल्पनेचा निर्धार करून कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र साकारले आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस यांच्या पुढाकाराने उभारलेल्या या विरंगुळा केंद्राचा फायदा ज्येष्ठांसह पक्ष्यांनाही होत आहे. भविष्यात येथे ओपन जीम सुरू करण्यात येणार आहे. कचऱ्यांचे ढीग व दुर्गंधीयुक्त जागेचे रूपडेच या उपक्रमातून पालटले आहे.
कोल्हापूर शहरातील राजारामपुरीतील दुसऱ्या गल्लीच्या कोपऱ्यांवर हा कचऱ्यांचा कोंडाळा होता. या ठिकाणी तीन गल्लींतील कचरा, बिल्डिंग वेस्टेज येऊन पडत होते. दुर्गंधीमुळे येथून येता-जाता नाक धरून जावे लागत होते. माश्यांचा प्रादुर्भाव वाढला होता.
दुर्गेश लिंग्रस यांनी सर्वप्रथम २०१० मध्ये हा कोंडाळा हटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तत्कालीन पालकमंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर जिल्ह्याधिकाऱ्यांनी या परिसरातील कचरा हटविण्यासाठी प्रयत्न केले. स्थानिक नागरिकांनीही हातभार लावत या परिसरात वेगवेगळ्या प्रकारची रोपे लावली.
आता या परिसराने बाळसे धरले आहे. आता येथे फायकस, कडुनिंब, औदुंबर, वड, सीताफळ, बोगनवेल बहरल्यामुळे या परिसराला वेगळेच रूप आले आहे. सुरुवातीला लावलेले वडाचे रोप आता १५ फूट उंच वाढून सावलीही देऊ लागले आहे.
जैवविविधतेचे आकर्षण
या परिसरात फुलपाखरेही बागडू लागली आहेत. पावसाळ्यात बेडकांचे हे ठिकाण ठरलेले आहे. यामुळे जैवविविधता वाढू लागली आहे. परिसरात वानरांचा उच्छाद असतो; मात्र या परिसराला चक्क त्यांनी आपल्या विश्रांतीचे ठिकाण बनवले आहे.
सकाळ-सायंकाळी फिरायला येणारे ज्येष्ठ, महाविद्यालयीन मुले, परिसरातील लहान मुले, महिला यांच्यासाठी ही जागा आता विरंगुळ्याचे केंद्र बनले असल्यामुळे या जागेचे रूपच पालटले आहे. या परिसराला हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र असे नामकरण केले आहे.
परिसरातील नागरिकांनी हा परिसर विकसित करण्यात हातभार लावला आहे. उद्योगपती अजय देसाई, शीतल संघवी, विद्यानंद बेडेकर यांनी जाणीवपूर्वक हा परिसर जास्तीत जास्त आकर्षक करण्यासाठी सहकार्य केले आहे. या परिसरात रात्री विद्युत रोषणाईही केली आहे. यासाठी महानगरपालिकेने मोठे सहकार्य केले आहे.
- दुर्गेस लिंग्रस,
शिवसेना शहरप्रमुख