भाजपा प्रदेशाध्यक्षांचा कोल्हापूर दौरा, कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यासाठी धनंजय महाडिक गडहिंग्लजमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 12:47 PM2023-09-25T12:47:43+5:302023-09-25T12:49:14+5:30

आजऱ्यातील जुन्या कार्यकर्त्यांच्या पाठोपाठ गडहिंग्लजमधील कार्यकर्त्यांच्या वेगळी भूमिका घेण्याच्या हालचाली

Kolhapur visit of BJP state president, Dhananjay Mahadik in Gadhinglaj to resolve disputes between workers | भाजपा प्रदेशाध्यक्षांचा कोल्हापूर दौरा, कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यासाठी धनंजय महाडिक गडहिंग्लजमध्ये

भाजपा प्रदेशाध्यक्षांचा कोल्हापूर दौरा, कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यासाठी धनंजय महाडिक गडहिंग्लजमध्ये

googlenewsNext

राम मगदूम

गडहिंग्लज : जिल्ह्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्याची जोरदार तयारी सुरू असतानाच गडहिंग्लजमध्ये पदाधिकारी निवडीवरून नव्या-जुन्या कार्यकर्त्यांमधील वाद उफाळून आला आहे. त्यामुळे भाजपाचे प्रवक्ते खासदार धनंजय महाडिक हे आज (सोमवारी) नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी गडहिंग्लजला येत आहेत.

७ ऑक्टोबरला प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे पहिल्यांदाच गडहिंग्लजच्या दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी कागल व चंदगड विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची रविवारी बैठक घेतली. त्या बैठकीकडे पाठ फिरवलेल्या जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी गडहिंग्लज कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्या निवासस्थानी बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांच्या फेरनिवडी करण्याची मागणी केली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुथप्रमुख आणि शक्ती केंद्रप्रमुख यांच्याशी थेट संवाद साधून पदाधिकाऱ्यांना चार्ज करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. परंतु, नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीवरून नाराज झालेल्या आजऱ्यातील जुन्या कार्यकर्त्यांच्या पाठोपाठ गडहिंग्लजमधील जुन्या कार्यकर्त्यांनीही वेगळी भूमिका घेण्याच्या हालचाली सुरू केल्यामुळे उपाध्यक्षांवर ‘पॅचअप’साठी येण्याची वेळ आली आहे.

कोलेकरांची शिष्टाई

गडहिंग्लजमधील संयुक्त बैठकीला जुन्या कार्यकर्त्यांनीही उपस्थित राहावे म्हणून त्यांना भेटण्याची इच्छा समरजित घाटगे यांनी व्यक्त केली. चव्हाणांच्या घरी बैठक सुरू असताना त्यांनी संपर्कही साधला. परंतु, नाराज कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी संवाद करण्यासही नकार दिला. त्यामुळे माजी तालुकाध्यक्ष अॅड. हेमंत कोलेकर यांनी थेट खासदार महाडिक यांच्याशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. म्हणूनच महाडिक गडहिंग्लजला येत आहेत.

नव्या निवडीला विरोध का?

गडहिंग्लज नगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीच्या पूर्वीपासून संघटना बांधणीसाठी धडपडणारे तत्कालीन शहराध्यक्ष रमेश रिंगणे यांना डावलून ऐनवेळी राष्ट्रवादीतून भाजपामध्ये आलेल्या वसंत यमगेकर यांना थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली. असे प्रकार यापुढे होऊ नयेत म्हणूनच पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्तीलाच जुन्या कार्यकर्त्यांनी हरकत घेतली आहे. त्यामुळेच मतभेदाची दरी रुंदावली असून, त्यावर काय तोडगा काढला जातो, याकडे गडहिंग्लजसह जिल्ह्याचे लक्ष आहे.

Web Title: Kolhapur visit of BJP state president, Dhananjay Mahadik in Gadhinglaj to resolve disputes between workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.