कोल्हापूर : दुग्धव्यवसाय प्रशिक्षणासाठी स्वयंसेविका ‘आनंद’कडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 05:39 PM2018-06-11T17:39:13+5:302018-06-11T17:39:13+5:30
‘गोकुळ’च्या स्वयंसेविका आधुनिक दूध व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी सोमवारी ‘आनंद’ गुजरातकडे रवाना झाल्या. या स्वयंसेविका ग्रामीण भागात जाऊन दूध उत्पादकांना किफायतशीर व आधुनिक दूध व्यवसायाची माहिती शिबिरांद्वारे देतात.
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या स्वयंसेविका आधुनिक दूध व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी सोमवारी ‘आनंद’ गुजरातकडे रवाना झाल्या. या स्वयंसेविका ग्रामीण भागात जाऊन दूध उत्पादकांना किफायतशीर व आधुनिक दूध व्यवसायाची माहिती शिबिरांद्वारे देतात.
‘गोकुळ’ने आतापर्यंत या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ५७६ गावांतील ४८ हजार उत्पादकांचे प्रबोधन केले आहे. जनावरांचे आहार संतुलन या कार्यक्रमामुळे जनावरांच्या दूध उत्पादनात वाढ तसेच उत्पादन खर्चात बचत झाल्याचे दिसून आले आहे. जनावरांचे वंध्यत्व, भाकडकाळ कमी होऊन दूध देण्याच्या कालावधीत वाढ झालेली आहे.
या कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी ‘गोकुळ’ प्रयत्नशील असून, स्वयंसेविका, स्वयंसेवकांना दूध व्यवसायाची अद्ययावत माहिती मिळण्यासाठी आनंद (गुजरात) येथे दोन दिवसांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
यासाठी ‘गोकुळ’च्यावतीने २५ महिला स्वयंसेविका रवाना झाल्या आहेत. पुढच्या टप्प्यात २५ पुरुष स्वयंसेवकांचा गट प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार असल्याचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले.
यावेळी संचालक अरुण डोंगळे, विलास कांबळे, पशुवैद्यकीय विभागाचे व्यवस्थापक डॉ. उदय मोगले, आहार संतुलन विभागाचे प्रमुख डॉ. डी. बी. कामत तसेच स्वयंसेविका गटाच्या प्रमुख प्रियांका भोई, वर्षा पाटील उपस्थित होत्या.