कोल्हापूर : जोतिबा यात्रेसाठी वाडी रत्नागिरी फुलली, शनिवारी यात्रेचा मुख्य दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 06:23 PM2018-03-29T18:23:16+5:302018-03-29T18:23:37+5:30

‘चांगभलं’चा गजर, गुलाल-खोबऱ्याची उधळण करत श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी येथील ‘दख्खनचा राजा’ जोतिबाच्या चैत्र यात्रेला गुरुवारपासून प्रारंभ झाला. शनिवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे.

Kolhapur: Wadi Ratnagiri Fullli for Jyotiba Yatra, main day of Yatra on Saturday; Start of Manna Saasan Katha | कोल्हापूर : जोतिबा यात्रेसाठी वाडी रत्नागिरी फुलली, शनिवारी यात्रेचा मुख्य दिवस

कोल्हापूर : जोतिबा यात्रेसाठी वाडी रत्नागिरी फुलली, शनिवारी यात्रेचा मुख्य दिवस

Next
ठळक मुद्देजोतिबा यात्रेसाठी वाडी रत्नागिरी फुललीशनिवारी यात्रेचा मुख्य दिवस मानाच्या सासनकाठ्या दाखल होण्यास प्रारंभ

कोल्हापूर : ‘चांगभलं’चा गजर, गुलाल-खोबऱ्याची उधळण करत श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी येथील ‘दख्खनचा राजा’ जोतिबाच्या चैत्र यात्रेला गुरुवारपासून प्रारंभ झाला. शनिवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे.

गुरुवारी पहाटेपासूनच हलगीच्या ठेक्यावर डोंगरावर मानाच्या सासनकाठ्या दाखल झाल्या. यात्रेची तयारी पूर्ण झाली असून, सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेशसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून भाविक सासनकाठ्यांसह दाखल झाल्याने डोंगर गुरुवारीच फुल्ल झाल्याचे चित्र होते.

अनेक मानाच्या सासनकाठ्या दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापूरसह परिसरातून पायी जाणाऱ्यांचीही संख्या अधिक आहे. यासह बैलगाडीतून जाणाऱ्या भाविकांची संख्या यंदा रोडावली आहे.

पर्याय म्हणून बीड, उस्मानाबाद, लातूर, पंढरपूर, बार्शी, सोलापूर,आदी भागांतून अनेक भाविकांनी खासगी आरामबसमधून प्रवास करण्यास प्राधान्य दिले आहे. अशा बसेसची ये-जा गुरुवारी दिवसभर पंचगंगा नदी परिसरात सुरू होती

पंचगंगेचा परिसर भाविकांनी फुलला

‘दख्खनचा राजा’ जोतिबाच्या यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीने पंचगंगा घाट बहरून गेला आहे. भाविकांची गर्दी, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि प्रशासनातर्फे घाटावर देण्यात आलेल्या सोयी-सुविधांमुळे घाटाला यात्रेचे स्वरूप आले आहे.

‘दख्खनचा राजा’ जोतिबाच्या चैत्र यात्रेला देशातील विविध राज्यांतून भाविक येतात. तिथे जाण्यापूर्वी अनेक भाविक पंचगंगा नदीघाटावर थांबतात. मैलोन्-मैल चालत आल्याने आलेला शीण घालविण्यासाठी पंचगंगेच्या पात्रामध्ये स्नान केल्यानंतर भाविक ‘दख्खनच्या राजा’च्या भेटीसाठी पुढे मार्गस्थ होतात.

त्यामुळे गुरुवारी दिवसभर सासनकाठी नाचवत, ‘चांगभलं’चा गजर आणि गुलालाची उधळण करत हे भाविक पंचगंगा घाटाकडे येत होते. भाविकांच्या सोयीसाठी अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल नदीघाटावर उभारण्यात आले आहेत. प्रशासनाच्या वतीनेही घाटावर जय्यत तयारी करण्यात आली आहे.

कोल्हापूर महापालिकेच्यावतीने यात्रेकरूंच्या सोयीसाठी येथे बूथ उभारला आहे; तर आपत्कालीन परिस्थितीत तसेच नदीत स्नान करणाऱ्या भाविकांना काही अडचण निर्माण होऊ नये यासाठी अग्निशमन दलाचा बंबाचीही सोय करण्यात आली आहे.

परगावांतून आलेल्या खासगी वाहनांचे ताफे या घाटावर उभे होते. दिवसभर घाटावर ‘चांगभलं’चा गजर करत, सवाद्य सासनकाठ्या, भगवे झेंडे घेऊन भाविक खासगी वाहनांतून येत होते. त्यानंतर स्नान करून पुन्हा जोतिबा डोंगराच्या दिशेने पायी, खासगी वाहनांतून जात होते. त्यामुळे कोल्हापूर-पन्हाळा या मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली होती.

घाटावर अन्नछत्र

शिवाजी चौक तरुण मंडळाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेकरूंसाठी पंचगंगा नदीघाटावर शुक्रवारी सकाळी अकरापासून मोफत अन्नछत्राची सोय करण्यात आली आहे.

यंदा शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस हे अन्नछत्र सुरू राहील. यात्रेकरूंसाठी कुर्मापुरी, कांदाभजी, जिलेबी, शिरा, मसालेभात असा मेन्यू असून जवळपास १ लाख यात्रेकरूंना याचा लाभ घेता येईल.

यासह यात्राकाळात सकाळी ७ ते ११ या दरम्यान कांदापोहे, शिरा, उप्पीट असा नाष्ट्याचीही सोय भक्तांकरिता करण्यात आली आहे. अन्नछत्रासाठी नदीघाटावर पाच हजार फुटांचा मंडप घालण्यात आला आहे. गणेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे व्यवस्थापन करण्यात आले आहे.

सहज सेवा ट्रस्ट, आर. के. मेहता चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दि. ३० मार्च ते १ एप्रिलदरम्यान भाविकांना मोफत अन्नछत्राची सोय करण्यात आली आहे. सहज सेवा ट्रस्टच्यावतीने गायमुख येथे मोठा मंडप उभारण्यात आला आहे.

या ठिकाणी गुरुवारी सकाळी नागपूरच्या एका भाविकाच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. यासह जोतिबा बसस्थानकाशेजारी आर. के. मेहता ट्रस्टच्यावतीने अन्नछत्राचे आयोजन केले आहे. त्याचे उद्घाटन काडसिद्धेश्वर महाराज व महापालिका आयुक्त अभिजित चौधरी यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता होणार आहे.
 

 

Web Title: Kolhapur: Wadi Ratnagiri Fullli for Jyotiba Yatra, main day of Yatra on Saturday; Start of Manna Saasan Katha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.