परतीच्या पावसाने कोल्हापूरला झोडपले, तासभर रस्ते सामसूम; खरीप पिकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 12:02 PM2023-09-27T12:02:04+5:302023-09-27T12:02:59+5:30

गणेश मंडळांची तारांबळ

Kolhapur was hit by heavy rains, Relief for kharif crops | परतीच्या पावसाने कोल्हापूरला झोडपले, तासभर रस्ते सामसूम; खरीप पिकांना दिलासा

छाया - आदित्य वेल्हाळ

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूर शहर व जिल्ह्यात मंगळवारी परतीच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले. पावसाविना अडचणीत आलेल्या खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. तब्बल एक तास एकसारख्या संततधार सुरू राहिल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. मंगळवारपर्यंत (दि. २) जिल्ह्यात दमदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.

यंदा मान्सून काहीसा नाराज आहे. जुलै महिन्याचा अपवाद वगळता पाऊसच झालेला नाही. पावसाळ्याचे चार महिने संपत आल्याने पाऊस होतो की नाही, अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे. मंगळवारी सकाळपासून वातावरणात काहीसा बदल होत गेला. ढगाळ, तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या.

दुपारनंतर आकाश गच्च झाले आणि सायंकाळी साडेचार वाजता कोल्हापूर शहरासह परिसरात पावसाने सुरुवात केली. तासभर पावसाने अक्षरश: झोडपून काढले. कोल्हापूर शहरात तर सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते. अनेक ठिकाणी रस्त्यावरच पाणी राहिल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली होती. गटारीत पाणी न बसल्याने काही ठिकाणी रस्त्यावर आले होते.

दरम्यान, मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असून आगामी पाच-सहा दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

गणेश मंडळांची तारांबळ

कोल्हापूर शहरात गणेश मंडळांचे देखावे खुले झाले आहेत. नेमका सायंकाळच्या वेळी जोरदार पावसाने सुरुवात केल्याने देखाव्याचे मंडप झाकण्यासाठी कार्यकर्त्यांची तारांबळ उडाल्याचे दिसले.

तासभर रस्ते सामसूम

कोल्हापूर शहरात संततधार पाऊस सुरू होता. या कालावधीत एरवी गजबजलेले रस्ते अक्षरश: ओस पडले होते. कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या वाहनचालक तासभर अडकून पडले होते.

Web Title: Kolhapur was hit by heavy rains, Relief for kharif crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.