कोल्हापूर : शहरात पाणी तुंबायला सुरूवात, तासभर जोरदार वळीव, जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 07:56 PM2018-05-17T19:56:08+5:302018-05-17T19:56:08+5:30
कोल्हापूर शहर आणि परिसरात गुरूवारी दुपारीच जोरदार वळीव बरसला. तासाभराच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबले. ग्रामीण परिसरातही अनेक ठिकाणी गारांसह पाऊस झाला आहे. शाहू स्टेडियमवर सुरू असलेला सतेज चषक अंतर्गत सुरू असलेला फुटबॉलचा सामनाही रद्द करावा लागला.
कोल्हापूर : शहर आणि परिसरात गुरूवारी दुपारीच जोरदार वळीव बरसला. तासाभराच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबले. ग्रामीण परिसरातही अनेक ठिकाणी गारांसह पाऊस झाला आहे. शाहू स्टेडियमवर सुरू असलेला सतेज चषक अंतर्गत सुरू असलेला फुटबॉलचा सामनाही रद्द करावा लागला.
शहरामध्ये दुपारी तीन नंतरच ढगाळ वातावरण झाले. ढगाळ वातावरणामुळे उन्हापासून सुटका झालेली असली तरी उकाडा वाढला होता.अखेर साडे चारच्या सुमारास जोरदार पावसाला सुरूवात झाली. सुमारे तासभर सलग पाऊस कोसळत होता. मात्र आज वीजा होत नव्हत्या.
सुदैवाने सोसाट्याचे वारे नसल्याने झाडाच्या फांद्या पडण्याचे फारसे प्रकार झाले नाहीत. त्यामुळे लक्ष्मीपुरी, धान्य लाईनपासून अनेक ठिकाणी सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचून तळी झाली होती.
संध्याकाळी कार्यालये सुटण्याच्या वेळेत जोरदार पाऊस झाल्याने अनेकांना कार्यालयांमध्ये थांबून रहावे लागले. फेरीवाले, भाजीवाले, आंबेविक्रेते यांचीही पावसामुळे पळापळ झाली. केएमटी गाड्यांचाही वेग मंदावला होता. अनेक चौकांमध्ये पावसामुळे कोंडी झाली होती.
सिग्नल नसलेल्या चौकात तर याची तीव्रता अधिक जाणवत होती. पावसाआधी दिवसभर अनेक ठिकाणी महावितरणच्यावतीने तुटलेल्या झाडांच्या अर्धवट फांद्या तोडण्याचे काम सुरू होते.