कोल्हापूर : तर प्रदूषण करणाऱ्यांविरोधात दांडके घेवू : उल्हास पाटील, भूमाता प्रदूषणमुक्त पंचगंगा जागर समाप्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 04:28 PM2019-01-07T16:28:48+5:302019-01-07T16:32:21+5:30
जगण्यासाठी आवश्यक असलेली जमीन आणि पाणी दोन्ही बिघडायला लागले आहे. पंचगंगा प्रदूषण आमच्या जीवावर उठत आहे. २५६ ठिकाणाहून प्रदूषण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. संंबंधितांनी हे प्रदूषण बंद करावे. अन्यथा हातात दांडके घेऊन त्यांचे डोके ठिकाणावर आणावे लागेल असा खरमरीत इशारा आमदार उल्हास पाटील यांनी दिला.
कोल्हापूर : जगण्यासाठी आवश्यक असलेली जमीन आणि पाणी दोन्ही बिघडायला लागले आहे. पंचगंगा प्रदूषण आमच्या जीवावर उठत आहे. २५६ ठिकाणाहून प्रदूषण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. संंबंधितांनी हे प्रदूषण बंद करावे. अन्यथा हातात दांडके घेऊन त्यांचे डोके ठिकाणावर आणावे लागेल असा खरमरीत इशारा आमदार उल्हास पाटील यांनी दिला.
आमदार पाटील आणि कृषितजज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आयोजित ‘भूमाता प्रदूषणमुक्त पंचगंगा जागर’ उपक्रमाचा समारोप सोमवारी दुपारी येथील दसरा चौकामध्ये करण्यात आला. त्यावेळी उल्हास पाटील यांनी हा इशारा दिला.
आमदार पाटील म्हणाले, दसरा चौकात गर्दी करणे आमचा हेतू नव्हता. गेल्या काही दिवसात सर्वजण ८६ किलोमीटर चाललो. शाळाशाळांमध्ये भेटी दिल्या. प्रबोधन केले. उदयनराजे भोसले आणि बुधाजीराव मुळीक या दोन आधारांवर हे काम सुरू आहे. सरकार कुणाचे आहे आणि मंत्रीपद कुणाकडे आहे यापेक्षा सुध्दा लोकांच्या जगण्यामरण्याचा प्रश्न आहे तो मांडण्याचे काम मी करत आहे. आतापर्यंत २७ केसीस झाल्या आहेत. २८ दिवस कळंबा जेलमध्ये काढली आहेत. त्यामुळे यापुढेही प्रदूषणमुक्तीसाठी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन देताना डॉ. बुधाजीवराव मुळीक म्हणाले, गेले १५ दिवस मी या उपक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यात आहे. पंचगंगेच्या काठावरचा कापड उद्योग हा पर्यावरणपूरक नाही. हे उद्योग नकोत असे लोकांना वाटायला लावू नका. कि त्येक लाख सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. आम्ही प्रबोधन करतच आहोत. मात्र आता याबाबत ठोस काही तरी कार्यवाही व्हावी.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने म्हणाले, कोल्हापूरवासियांना थेट धरणातील शुध्द पाणी प्यायला पाहिजे. मात्र शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील जनतेला सांडपाणी आणि मलमुत्राचे पाणी पिण्याची वेळ आली आहे. राजकारण गेलं चुलीत. मात्र या प्रश्नावर आता आरपारची लढाई लढावी लागेल.
माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, पंचगंगा प्रदूषणाचा विषय अतिशय महत्वाचा आहे. म्हणून इचलकरंजी आणि परिसरातील वस्त्रोद्योगाशी संबंधितांनी आपल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करावी यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव म्हणाले, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी हे गेंड्याच्या कातडीचे आहेत म्हणूनच पंचगंगेच्या प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे.
यावेळी गायत्री मुळीक, रजनीताई मगदूम, पराग पाटील, शेखर पाटील, टी. वाय. पाटील, जिल्हा परिषद सदस्या स्वाती सासने,मधुकर पाटील, वसंतराव मुळीक, पृथ्वीराज यादव, मंगल चव्हाण, राष्ट्रीय खेळाडू कमल सावंत, रेखा जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते.
गुरूकडून विद्यार्थ्याकडे निवेदन
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी गेल्यानंतर डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी अविनाश सुभेदार यांच्याकडे पहात हे माझे विद्यार्थी अशी ओळख करून दिली. सुभेदार यांनीही नमस्कार करत डॉ. मुळीक यांचे स्वागत केले. शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या गप्पाही यावेळी झाल्या.
धरणातील पाणी आणि पंचगंगेचे पाणी
पंचगंगा उगमस्थानावरून ही रॅली दुपारी १२ च्या सुमारास दसरा चौकामध्ये आली. यावेळी एका गाडीवर राधानगरी, काळम्मावाडी, तुळशीसह अन्य धरणातील पाणी भरून ठेवले होते आणि एका कंटेनरमध्ये पंचगंगेचे पिवळसर,अशुध्द पाणी ठेवण्यात आले होते.