कोल्हापूर : ‘महात्मा फुले योजने’तील दोषी रुग्णालयांवर पुढे काय?, कारवाई गुलदस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 04:02 PM2018-11-03T16:02:22+5:302018-11-03T16:04:12+5:30
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यामधील दोषी रुग्णालयांवर कारवाई झाली; पण या रुग्णालयांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढे कोणती कारवाई केली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
कोल्हापूर : महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यामधील दोषी रुग्णालयांवर कारवाई झाली; पण या रुग्णालयांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढे कोणती कारवाई केली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
सर्वसामान्यांसाठी तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने ही आरोग्य योजना पाच वर्षांपूर्वी सुरू केली. जिल्ह्यातील ३२ रुग्णालयांचा या योजनेत समावेश आहे. या योजनेतील काही रुग्णालयांनी रुग्णांकडून जादा पैसे घेणे, त्यांना जास्त दिवस रुग्णालयात उपचारासाठी ठेवणे, आदी आॅनलाईनच्या तक्रारी योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे एकाच वेळी योजनेत असलेल्या जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांवर १२ आॅक्टोबरला या योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी छापे टाकले.
या कारवाईमधून दहा रुग्णालयांना निलंबित, तर चार जणांना या योजनेतून काढून टाकण्यात आले. त्यानंतर ही कारवाई पुढे दोन-तीन दिवस सुरू राहिली; पण कारवाई केलेल्या रुग्णालयांचे पुढे काय झाले, हे गुलदस्त्यात राहिले. परंतु रुग्णालयांवरील छाप्यांची शहरात आजही चर्चा सुरू आहे. दोषी रुग्णालयांवर वरिष्ठांनी पुढे कोणती कारवाई केली?, की पुन्हा निलंबित केलेल्या रुग्णालयांना या योजनेत सामावून घेणार का ? अशी चर्चा सर्वसामान्यांतून सुरू आहे.
‘आयुष्यमान’मध्येही नको !
सध्या केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘आयुष्यमान भारत’ या योजनेचे काम महात्मा फुले जनआरोग्य योजनेकडे आहे. पहिल्या टप्प्यात शासकीय रुग्णालयांचा ‘आयुष्यमान’मध्ये समावेश आहे. दरम्यान, महात्मा फुले योजनेमधून निलंबित केलेल्या व योजनेतून काढून टाकलेल्या रुग्णालयांना ‘आयुष्यमान’मध्ये समाविष्ट करू नये, अशीही मागणी नागरिकांतून होत आहे.