कोल्हापूर : आत्मदहनाचा इशारा देताच महापालिका प्रशासन हलले, विनापरवाना बांधकाम हटविण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 11:56 AM2018-05-31T11:56:53+5:302018-05-31T11:56:53+5:30
जागृतीनगर येथील शकुबाई यशवंत सांगावकर (वडर) या महिलेने महानगरपालिका चौकात आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यामुळे महापालिका प्रशासन, पोलीस, अग्निशमन दल यांची धावपळ उडाली. काही तासांतच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे विनापरवाना बांधकाम पाडून टाकण्याच्या सूचना विभागीय कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
कोल्हापूर : खासगी जागेत कुळाकडून झालेले विना परवाना बांधकाम काढून टाकण्याच्या मागणीकडे महापालिका प्रशासनाचे होत असलेल्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधण्याकरिता जागृतीनगर येथील शकुबाई यशवंत सांगावकर (वडर) या महिलेने महानगरपालिका चौकात आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यामुळे महापालिका प्रशासन, पोलीस, अग्निशमन दल यांची धावपळ उडाली. काही तासांतच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे विनापरवाना बांधकाम पाडून टाकण्याच्या सूचना विभागीय कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
जागृतीनगर येथील जागृतीनगर को. आॅपरेटिव्ह हौसिंग सोसायटीने विकसित केलेल्या योजनेतील नऊशे चौरस फुटांची जागा शकुबाई यशवंत सांगावकर (वडर) यांच्या मालकीची असून या जागेचा रितसर घरफाळा त्यांनी भरलेला आहे. ही जागा त्यांच्या नावावर आहे. दहा वर्षांपूर्वी त्यांनी अनुसया धर्माजी काटकर यांना कुळ म्हणून काही जागा वापरायला दिली होती. त्या जागेवर काटकर यांनी अतिक्रमण करून स्वखर्चाने घर बांधले.
यासंदर्भात सांगावकर यांनी काटकर यांच्या विरोधात महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या,परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यानंतर अलीकडेच काटकर यांनी पहिल्या माळ्याचेही बांधकाम सुरू केले. त्यावेळीही तक्रार दिली. मात्र, काहीच कारवाई केली नाही म्हणून सांगावकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार देऊन ३० मेपर्यंत हे बांधकाम पाडले नाही तर महापालिका चौकात आत्मदहन करू, असा इशारा दिला.
त्यानुसार शकुबाई सांगावकर या त्यांची मुलगी, नातू यांच्यासह सकाळी साडेअकरा वाजता महापालिका चौकात गेल्या. त्यांना पोलिसांनी रोखले. त्यांची तपासणी केली आणि अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांच्याकडे नेले. तेथे सर्व कागदपत्रे पाहून पाटणकर यांनी काटकर यांचे ‘विना परवाना बांधकाम’ काढून टाकण्याच्या सूचना विभागीय कार्यालयाला दिल्या.