कोल्हापूर : शौचालये झाली, ड्रेनेज लाईन कधी? स्थायी समिती सभेत विचारला प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 11:36 AM2018-08-04T11:36:31+5:302018-08-04T11:36:53+5:30
ड्रेनेज लाईन टाकणार तरी कधी, असा संतप्त सवाल स्थायी समिती सभेत नगरसेविका भाग्यश्री शेटके यांनी प्रशासनास केला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती आशिष ढवळे होते.
कोल्हापूर : पांजरपोळ परिसरातील नागरी वस्तीत खासगी संस्थेने मोफत घरगुती शौचालये बांधून दिली, पण महानगरपालिका प्रशासनास या वस्तीत अद्याप ड्रेनेज लाईन टाकता आलेली नाही; त्यामुळे नगरसेविका भाग्यश्री शेटके यांनी याबाबतचा विषय शुक्रवारी झालेल्या स्थायी समिती सभेत उपस्थित करून ड्रेनेज लाईन टाकणार तरी कधी, असा संतप्त सवाल प्रशासनास केला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती आशिष ढवळे होते.
गेल्या काही दिवसांपासून निधी नसल्याचे कारण देत प्रशासन ड्रेनेज लाईन टाकण्यास चालढकल करीत आहे; त्यामुळे एखाद्या सामाजिक संस्थेने मोफत शौचालये बांधून देऊनसुध्दा त्याचा उपयोग झालेला नाही. ज्या हेतूने शौचालये बांधण्यात आली, त्याचा हेतूच साध्य झालेला नाही.
नागरिकांच्या शौचालयाचे पाणी शेवटी उघड्या गटारीत येत आहे; त्यामुळे भाग्यश्री शेटके यांनी त्याचा वारंवार पाठपुरावा केला; मात्र निधी नसल्याचे कारण देत काम करण्यास टाळले. त्याबद्दलचा संताप त्यांनी स्थायी सभेत व्यक्त केला.
पांजरपोळ भागात ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी २१ लाखांचे इस्टिमेट तयार केले असून त्यामधील सात लाखांचे बजेट उपलब्ध आहे; त्यामुळे हे काम प्राधान्याने करू, अशी ग्वाही प्रशासनाने दिली.
नगरसेवकांनी प्रभागातील नागरिकांच्या आरोग्य, लाईटसंबंधी तक्रारी दिल्या तर तीन- चार दिवस त्यांचे निराकरण होत नाही; परंतु आॅनलाईन तक्रार दिल्यास चोवीस तासांत निराकरण केले जाते. नगरसेवकांच्या तक्रारीला महत्त्व दिले जात नाही, अशी तक्रार प्रतीक्षा पाटील यांनी सभेत केली.
नगरसेवकांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्या तातडीने सोडविण्याच्या सूचना आढावा बैठकीत दिल्या जातील, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
खुल्या जागांवर उभारण्यात आलेल्या हॉलचा ताबा कोणाकडे आहे, अशी विचारणा करत साळोखेनगर येथील दोन हॉल अद्याप ताब्यात घेतलेले नाहीत.
शहरात असे किती हॉल महापालिकेने ताब्यात घेतलेले नाहीत याची माहिती स्थायी समितीला द्या, अशी मागणी प्रतीक्षा पाटील यांनी केली. यावेळी झालेल्या वेगवेगळ्या विषयांवरील चर्चेत दीपा मगदूम, संजय मोहिते यांनीही भाग घेतला.