कोल्हापूर : सुविधांची वानवा असताना ‘स्पोर्ट झोन’ चे कौतुक कशाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 01:38 PM2018-09-14T13:38:57+5:302018-09-14T13:42:27+5:30
प्रशासनाने केवळ ‘स्पोर्ट झोन’चा फलक लावून दिखाऊपणा करण्याऐवजी विभागीय क्रीडा संकुलाच्या पूर्णत्वाकडे लक्ष द्यावे. सुविधांच्या उभारणीसाठी भरीव स्वरूपात योगदान द्यावे, अशी मागणी क्रीडाप्रेमींतून होत आहे.
कोल्हापूर : फुटबॉल, जलतरण, नेमबाजी, कुस्ती अशा विविध क्रीडाप्रकारांमध्ये कोल्हापूरचे खेळाडू चमकत आहेत. ते निव्वळ स्व:कर्तृत्वावर. त्यांना जिल्ह्यात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे म्हणावे तितके लक्ष नाही. जिल्ह्यात क्रीडाविषयक आवश्यक सुविधांची वानवा असताना प्रशासनाने केवळ ‘स्पोर्ट झोन’चा फलक लावून दिखाऊपणा करण्याऐवजी विभागीय क्रीडा संकुलाच्या पूर्णत्वाकडे लक्ष द्यावे. सुविधांच्या उभारणीसाठी भरीव स्वरूपात योगदान द्यावे, अशी मागणी क्रीडाप्रेमींतून होत आहे.
तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने गेल्या दहा वर्षांपूर्वी कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली जिल्ह्यांसाठी विभागीय क्रीडा संकुल हे कोल्हापूरमध्ये मंजूर केले. या संकुलात १७ कोटी रुपयांची कामे झाल्याचे क्रीडा विभागाकडून सांगितले जात आहे; मात्र प्रत्यक्षात जलतरण तलाव, डायव्हिंग तलाव, नेमबाजीसाठीचे शूटिंग रेंज अपूर्ण आहे. सिंथेटिक अॅथलेटिक्स मैदान, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल मैदान आंतरराष्ट्रीय मानांकनाला धरून नाहीत.
फुटबॉल मैदान योग्य स्वरूपात नाही, अशा पद्धतीने या संकुलाची स्थिती आहे. छत्रपती शिवाजी स्टेडियमची दुरवस्था आहे. अॅथलेटिक्स् खेळाडूंसाठी चांगले मैदान उपलब्ध नाही. या संकुलाच्या पूर्णत्वाकडे लक्ष देण्याऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ‘स्पोर्ट झोन’ चा नुसता फलक उभारून प्रशासनाला काय साध्य करावयाचे आहे. संकुल पूर्णत्वास आल्यास चांगले खेळाडू तयार होण्यास निश्चितपणे गती मिळेल, असे मत क्रीडाप्रेमींतून व्यक्त होत आहे.
क्रीडाक्षेत्रातील कोल्हापुरी टॅलेंटला बळ देण्यासाठी विभागीय क्रीडा संकुल हे सर्व सुविधा आणि पूर्ण क्षमतेने खुले होणे आवश्यक आहे; पण, गेल्या नऊ वर्षांपासून हे संकुलाचे काम पूर्ण करण्यात सरकार आणि जिल्हा प्रशासन अपयशी ठरले आहे. अशा स्वरूपातील नाकर्तेपणा असताना निव्वळ ‘स्पोर्ट झोन’चा फलक लावून प्रशासनाला काय सिद्ध करायचे आहे, तेच समजत नाही. या संकुलाच्या पूर्णत्वाकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
- जीवन बोडके, आर्किटेक्ट
खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा सत्कार करणे ठीक आहे; पण, गरजेच्या सुविधा उपलब्ध नसताना निव्वळ फलक उभारून कौतुक करणे योग्य नाही. कोल्हापूरमधील खेळाडूंना ताकद देण्यासाठी, नवी पिढी घडविण्याकरिता विभागीय संकुलाची पूर्ण सुविधांसह उभारणी गरजेची आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने पावले टाकावीत.
- विकास पाटील,
माजी फुटबॉल खेळाडू