कोल्हापूर : हयातीचे दाखले देण्यासाठी कोल्हापूरला का येता..?, पीएफ कार्यालयाची विचारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 11:35 AM2018-11-17T11:35:43+5:302018-11-17T11:37:47+5:30
भविष्य निर्वाह निधी कार्यालयात (पीएफ) कोल्हापूरात येवून हयातीचे दाखल देण्याची गरज नसताना कोल्हापूरसह पाच जिल्ह्यांतून लोक येथे हेलपाटे घालत आहेत. ही सोय आॅनलाईन उपलब्ध करून दिली असताना तिथेच ही प्रक्रिया न करता लोक रोज येथील ताराबाई पार्क कार्यालयात गर्दी करत आहेत. त्यात त्यांचेच हेलपाटे व आर्थिक भुर्दंडही बसत आहे.
कोल्हापूर : भविष्य निर्वाह निधी कार्यालयात (पीएफ) कोल्हापूरात येवून हयातीचे दाखल देण्याची गरज नसताना कोल्हापूरसह पाच जिल्ह्यांतून लोक येथे हेलपाटे घालत आहेत. ही सोय आॅनलाईन उपलब्ध करून दिली असताना तिथेच ही प्रक्रिया न करता लोक रोज येथील ताराबाई पार्क कार्यालयात गर्दी करत आहेत. त्यात त्यांचेच हेलपाटे व आर्थिक भुर्दंडही बसत आहे.
केवळ आॅनलाईन प्रक्रिया माहीत नसल्याने एक दाखला मिळविण्यासाठी सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या सेवानिवृत्तांवर कोल्हापूरचे हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. तालुका, जिल्हा पातळीवरील महा ई-सेवा केंद्रासह राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये आॅनलाईन माहिती भरण्याची सोय उपलब्ध करून दिली असतानाही सेवानिवृत्त इकडे येतातच कशाला असा प्रश्र्न उपस्थित होत आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे कामकाज कोल्हापुरातून चालते. या पाच जिल्ह्यांत १ लाख ४९ हजार इतके सेवानिवृत्त आहेत. त्यांना निवृत्ती वेतन मिळण्यासाठी हयातीचा दाखला वर्षातून एकदा देणे बंधनकारक असते.
हा दाखला मिळवण्यासाठी पूर्वी भविष्य निर्वाह निधी कार्यालयात प्रत्यक्षात यावे लागत होते; पण अलीकडे भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाचे संपूर्ण कामकाज आॅनलाईन झाले आहे, घरबसल्या आता एका क्लिकवर पेन्शन आणि फंडाविषयी सर्व माहिती मिळते. सर्व प्रकारचे दाखले, कागदपत्रांची पडताळणी, पैसे काढणे, आदी बाबींची आॅनलाईन मागणी नोंदवून सहज प्राप्त करता येऊ शकते, त्यासाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची आवश्यकताही राहिलेली नाही.
तरीदेखील या प्रक्रियेविषयी अज्ञान असल्याने एका हयातीच्या दाखल्यासाठी लोक रत्नागिरीहूून पाच तासांचा प्रवास करून दिवस दिवसभर कोल्हापुरातील कार्यालयासमोर प्रतीक्षा करत बसलेले दिसतात. बऱ्याच जणांना आॅनलाईन यंत्रणा वापरता येत नसल्याने त्यांना मदत करण्यासाठी कार्यालयात दोन टेबल ठेवण्यात आले आहेत. येथे आलेल्यांना माहिती दिली जाते; पण हे अजून किती दिवस करायचे?असा इथल्या कर्मचाºयांचा सवाल आहे. विनाकारण या यंत्रणेवर याचा ताण पडत आहे.
बँकांना सेवेचा मोबदला
तालुका, जिल्हा पातळीवरील महा ई- सेवा केंद्राबरोबरच राष्ट्रीयीकृत बँकांमधून अशा प्रकारचे दाखले व क्लेम सादर करण्यासाठी आॅनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने उपलब्ध करून दिली आहे. सर्व्हिस चार्ज म्हणून कार्यालयाकडे बँकांना याचा मोबदलाही दिला जातो; पण काही बँकांमध्ये अशाप्रकारे फॉर्म भरून घेण्यास टाळाटाळ होत असल्याच्याही तक्रारी कार्यालयाकडे आल्या आहेत. अशा प्रकारे तक्रार आल्यास त्याची कार्यालयाकडून तातडीने दखल घेतली जाते.
अशी असते आॅनलाईन प्रक्रिया
या वेबसाईटवर आपला युएएन नंबर टाकून आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबूक लिंक केल्यावर संबंधित खातेदाराला ओटीपी येतो. तो ओटीपी दिल्यावर आपले खाते उघडते. सीपीओ नंबर टाकून आपल्या खात्यातील जमा रक्कम, पेन्शन रक्कम, पैसे काढणे, दाखला जोडणे, आदी कामाच्या बाबतीत प्रक्रिया करण्यासाठी विनंती टाकता येते; यासाठी आधी आपल्या पीएफ खात्याशी आधारकार्ड, पॅनकार्ड लिंक करणे अत्यावश्यक असते.