कोल्हापूर ज्येष्ठ मल्लांना तूर्त चार महिन्यांचेच मानधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:57 AM2017-12-15T00:57:16+5:302017-12-15T00:59:21+5:30
कोल्हापूर : हिंद केसरी व महाराष्ट्र केसरी मल्लांचे मासिक मानधन मार्चपासून प्रलंबित आहे; परंतु सरकार गरीब असल्याने या मल्लांचे एप्रिल ते जुलै या चारच महिन्यांचेच मानधन
कोल्हापूर : हिंद केसरी व महाराष्ट्र केसरी मल्लांचे मासिक मानधन मार्चपासून प्रलंबित आहे; परंतु सरकार गरीब असल्याने या मल्लांचे एप्रिल ते जुलै या चारच महिन्यांचेच मानधन तूर्त मंजूर केले आहे. या मानधनाचे बिल जिल्हा कोषागार कार्यालयाने गुरुवारी दुपारी मंजूर केले. आज, शुक्रवारी या मल्लांच्या खात्यावर मानधनाची रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्णांतील १९ मल्लांची ३ लाख ४० हजार रुपये एवढी ही रक्कम आहे.
या ज्येष्ठ कुस्तीपटूंचे मानधन गेल्या दहा महिन्यांपासून प्रलंबित असल्याचे वृत्त १२ डिसेंबरला दिले होते. याप्रश्नी बुधवारी शिवसेनेने जिल्हा क्रीडा कार्यालयास टाळे ठोकले. यावेळी क्रीडा अधिकाºयांनी तांत्रिक कारणाने हे मानधन रखडले, असे सांगितले. याचा शोध ‘लोकमत’ने घेतला असता क्रीडा विभागानेच मानधनाचे बिल आजअखेर कोषागार कार्यालयात जमा केले नसल्याचे स्पष्ट झाले. कोषागार कार्यालयाने सह्यांची खात्री करण्यासाठी बिले थांबवून ठेवल्याने मल्लांना हे मानधन देण्यात विलंब झाल्याचे क्रीडा संचालक नरेंद्र सोपल यांनी सांगितले होते; परंतु सोपल यांनी दिलेली माहिती खोटी असल्याचे कोषागार कार्यालयात चौकशी केल्यावर स्पष्ट झाले.
मल्लांच्या मानधनाचे बिल कोल्हापूर क्रीडा कार्यालयाने गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत कोषागार कार्यालयातच जमा केले नव्हते. ‘लोकमत’ने चौकशी केल्यानंतर सूत्रे हलली आणि तातडीने दुपारी तीननंतर कोषागार कार्यालयात बिल जमा केले. कोणतीही त्रुटी नसल्याने हे बिल तातडीने मंजूर केल्याचे जिल्हा कोषागार अधिकारी रमेश लिधडे यांनी सांगितले. बिल जमा न करता कोषागार कार्यालयामुळे बिलास उशीर झाला, अशी खोटी माहिती जबाबदार अधिकारी कशी देतात, याबद्दल तिथे आश्चर्य व्यक्त केले. क्रीडा विभागाचे आयुक्त सुनील केंद्रेकर यांना मानधनाबाबत शंका आल्याने त्यांनी १९९३ ते २०१७ पर्यंतच्या मल्लांना मानधन देण्याचे जे आदेश झाले ते सर्व तपासले. त्यामुळेही मानधनास विलंब झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
अधिकाºयांकडून कर्जमाफीचे कारण
या मल्लांचे दहा महिन्यांचे मानधन प्रलंबित आहे. ही रक्कम चार-दोन लाखांत आहे; परंतु तरीही पुरेसा कॅश फ्लो नाही म्हणून चारच महिन्यांचे मानधन आता मंजूर करण्यात आले आहे. कर्जमाफीमुळे कमी कॅश फ्लो असल्याचे अधिकारी सांगतात परंतु दहा महिन्यांपासून मानधन प्रलंबित आहे तर ते एकदाच देऊन टाकावे, असे प्रयत्न होताना दिसत नाहीत.