कोल्हापूर देशातील प्रत्येक शहराला जोडणार - मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; कोल्हापूर-बेंगळूरु विमानसेवा सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 08:13 PM2023-01-13T20:13:11+5:302023-01-13T20:13:45+5:30

प्रवासी योगेंद्र व्यास यांना पहिला बोर्डिंग पास देण्यात आला

Kolhapur will connect every city in the country says Minister Jyotiraditya Scindia; Kolhapur-Bengaluru flight service started | कोल्हापूर देशातील प्रत्येक शहराला जोडणार - मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; कोल्हापूर-बेंगळूरु विमानसेवा सुरु

कोल्हापूर देशातील प्रत्येक शहराला जोडणार - मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; कोल्हापूर-बेंगळूरु विमानसेवा सुरु

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूर हे विमानसेवेने देशातील प्रत्येक शहराला जोडण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले. कोल्हापूर - बेंगळूरु विमानसेवेचा प्रारंभ केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग, इंडिगोचे प्रधान सल्लागार आर.के. सिंग यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. 

दरम्यान, कोल्हापूर येथून खासदार धनंजय महाडिक (ऑनलाईन), खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील,  प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, कोल्हापूर विमानतळचे संचालक अनिल शिंदे, उद्योजक कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रवासी योगेंद्र व्यास यांना पहिला बोर्डिंग पास देण्यात आला. ही विमानसेवा कोल्हापूर येथून बंगळुरु पर्यंत तसेच पुढे कोईम्बत्तुर पर्यंत असल्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. कार्यक्रमाला विमानतळ विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री सिंधिया म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यामुळे जगभरात कोल्हापूरला ओळखले जाते. कोल्हापूर विमानतळ विकासासाठी आजवर 255 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून कोल्हापूरच्या विकास आणि प्रगती साधण्यासाठी यापुढेही प्राधान्य देण्यात येईल. 

राज्यमंत्री व्ही. के. सिंग म्हणाले, मराठा साम्राज्यातील महत्वाचे ठिकाण असणारे कोल्हापूर श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिरासह अन्य पर्यटन स्थळांसाठीही सर्वत्र परिचित आहे. भविष्यात कोल्हापूर मधून अधिकाधिक विमानसेवा सुरु होण्यासाठी तसेच अन्य शहरांना जोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

इंडिगोच्या कोल्हापूर मधून सुरु असणाऱ्या विमानसेवांची माहिती देवून यापुढेही विमानसेवा देण्यावर भर देण्यात येईल, असे इंडिगोचे प्रधान सल्लागार आर.के. सिंग यांनी सांगितले.

खासदार संजय मंडलिक म्हणाले, कोल्हापूर- बेंगळूरु विमानसेवा पुन्हा सुरु झाल्यामुळे कोल्हापुरच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल. विविध शहरांना जोडणाऱ्या विमानसेवा कोल्हापूर मधून सुरु होत आहेत. याला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून लवकरच कोल्हापूर विमानतळ हे देशातील महत्वपूर्ण विमानतळ ठरेल.

आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, विमानतळाचा सातत्याने विकास होत असून विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगच्या कामाला गती द्यावी. कोल्हापूरच्या प्रगतीसाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया.

कृष्णराज महाडिक यांनी, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आजवर कोल्हापूर विमानतळासाठी महत्वपूर्ण सहकार्य केले आहे. यापुढेही विमानतळाच्या विकासासाठी प्रयत्न करतील अशी आशा व्यक्त केली.

Web Title: Kolhapur will connect every city in the country says Minister Jyotiraditya Scindia; Kolhapur-Bengaluru flight service started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.