कोल्हापूर उत्तरमधून ‘शेकाप’ लढणार
By admin | Published: September 13, 2014 12:33 AM2014-09-13T00:33:06+5:302014-09-13T00:34:01+5:30
भाकपला इशारा : आंदोलनाचे श्रेय एका पक्षाचे नाही
कोल्हापूर : कोल्हापुरात झालेल्या टोल आंदोलनासह इतर आंदोलनाचे श्रेय कोणा एकाचे नसून कोल्हापूर उत्तरमधून कोणत्याही परिस्थितीत शेतकरी कामगार पक्ष निवडणूक लढविणार असल्याचा इशारा पक्षाच्यावतीने ‘भाकप’ला दिला.
लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात डावी लोकशाही आघाडीच्यावतीने माजी आमदार संपतराव पवार यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली होती. त्यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पुढाकार घेत आघाडीचा घटकपक्ष नसलेल्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यामुळे आता ‘भाकप’ने कोल्हापूर उत्तरमधून जाहीर केलेली उमेदवारी मान्य नसल्याचे पक्षाच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. कोल्हापूर उत्तरमधून ‘भाकप’चे रघुनाथ कांबळे यांची उमेदवारी जाहीर केल्याचे समजते. टोल विरोधी आंदोलन असेल थेट पाईपलाईन प्रश्न अशा प्रश्नांवर सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. ‘शेकाप’चे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, गोविंद पानसरे, संपतराव पवार यांच्याबरोबर सर्व पक्षांच्या नेत्यांनी लढ्याचे नेतृत्व केले. कोल्हापुरात स्वबळावर निवडणूक लढवावी लागली तरी कार्यकर्त्यांनी तयारी ठेवावी, असे आवाहन ‘शेकाप’ चे जिल्हा सहचिटणीस दिलीपकुमार जाधव व शहर चिटणीस बाबूराव कदम यांनी प्रसिद्धीपत्रकातून केले आहे.