कोल्हापूर : ‘त्या’ दोघा समाजकंटकाना तडीपार करणार : सुरज गुरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 07:10 PM2018-04-03T19:10:30+5:302018-04-03T19:10:30+5:30
गिरगाव (ता. करवीर) येथील दोन्ही समाजात तेढ निर्माण होईल, असा आक्षेपार्ह मॅसेज वॉटस्अॅपवरून प्रसारित करणारे समाजकंठक संशयित संग्राम भिकाजी कांबळे (वय १९), अरुण अशोक पाटील (२०, दोघे रा. गिरगाव) या दोघांना जिल्ह्यातून तडीपार करणार आहे.
कोल्हापूर : गिरगाव (ता. करवीर) येथील दोन्ही समाजात तेढ निर्माण होईल, असा आक्षेपार्ह मॅसेज वॉटस्अॅपवरून प्रसारित करणारे समाजकंठक संशयित संग्राम भिकाजी कांबळे (वय १९), अरुण अशोक पाटील (२०, दोघे रा. गिरगाव) या दोघांना जिल्ह्यातून तडीपार करणार आहे.
यापुढे जातीय तेड निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही, असा इशारा करवीरचे पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव यांनी मंगळवारी दिला. घटनेच्या पार्श्वभूमिवर दोन्ही समाजातील लोकांची गांधीनगर पोलीस ठाण्यात शांतता बैठकीचे आयोजन केले होते.
गिरगाव येथील आकाश संजय खेडकर या तरुणाच्या मोबाईलवर आक्षेपार्ह मजकूर पाठविल्याने गावात दोन्ही समाजामध्ये तणाव पसरला. याप्रकरणी इस्पूर्ली पोलिसांनी दलित समाजाच्या संग्राम कांबळे याला अटक केली. त्यानंतर सवर्ण समाजाच्या अरुण पाटील याला अटक केली. या अटक सत्रावरुन दोन्ही समाजातील लोक घराबाहेर पडत मुख्य चौकात जमा झालेने तणाव पसरला होता.
पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव हे फौजफाट्यासह गावात दाखल झाल्याने तणाव निवाळला. पुन्हा दोन्ही समाजामध्ये वादविवाद होवू नये, यासाठी समाजातील काही प्रमुख व्यक्तिंची मंगळवारी दूपारी गांधीनगर पोलीस ठाण्यात बैठक आयोजित केली होती. यावेळी पोलीस उपअधीक्षक गुरव यांनी दोन्ही समाजातील लोकांची समजूत घालत शांततेचे आवाहन केले.
कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करु नये, तरुणपिढीचे शैक्षणिक नुकसान होईल. शांतता प्रस्थापीत करण्यासाठी सर्वांनी ऐकोप्याने रहावे. यावेळी गुन्हे मागे घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. त्यावर गुरव यांनी गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत.
समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार आहे. अटक केलेल्या दोन्ही समाजकंटकांना जिल्ह्यातून तडीपार केले जाणार आहे. यापुढे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, याची जबाबदारी दोन्ही समाजाने घ्यावी, अशा सुचना केल्या. बैठकीस दोन्ही समाजातील लोक उपस्थित होते.