कोल्हापूरला ‘मटकापूर’ होऊ देणार नाही
By admin | Published: January 6, 2015 11:03 PM2015-01-06T23:03:33+5:302015-01-07T00:06:44+5:30
जिल्हा पोलीसप्रमुख : शिवाजी विद्यापीठात पत्रकार दिन उत्साहात
कोल्हापूर : स्वातंत्र्यचळवळ असो की, विविध प्रश्नांवरील आंदोलने; यामध्ये कोल्हापूरचे वेगळेपण आहे. शिवाय सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, आदी क्षेत्रांत याचे मोठे योगदान आणि लौकिकदेखील आहे. तो कायम राहावा, तसेच कोल्हापूरची ‘मटकापूर’ अशी ओळख होऊ नये, यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी आज, मंगळवारी येथे दिली.
शिवाजी विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभाग, मास कम्युनिकेशन, विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मानव्यशास्त्र सभागृहातील कार्यक्रमास माहिती उपसंचालक वर्षा शेडगे प्रमुख उपस्थित, तर प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे अध्यक्षस्थानी होते.
डॉ. शर्मा म्हणाले, सध्याची पत्रकारिता संक्रमण काळात आहे. माध्यमे करीत असलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मुळे समाज, राजकीय नेतेमंडळी, शासकीय अधिकारी, आदींवर वचक राहत आहे. शिवाय, भ्रष्टाचारासह दुष्ट प्रवृत्तींना आळा बसत आहे. कोल्हापूरचा विविध क्षेत्रांत नावलौकिक आहे; पण, गेल्या काही वर्षांत त्याला ‘मटक्या’चा डाग लागू पाहत आहे. या दृष्टीने कडक पावले उचलणार आहे.
डॉ. भोईटे म्हणाले, देशाच्या संस्कृतीचे रक्षण पत्रकार करतात. माध्यमांनी समाजाला सुशिक्षित करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे.
कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष अनिल देशमुख, डॉ. रत्नाकर पंडित, श्रीहरी देशपांडे, आदी उपस्थित होते. वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागप्रमुख डॉ. निशा पवार यांनी स्वागत केले. जयप्रकाश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
डॉ. सुमेधा साळुंखे यांनी आभार मानले. दरम्यान, सानिका मुतालिक व मंदार पाटील यांनी स्वागतपर गीत सादर केले. (प्रतिनिधी)