कोल्हापूरला नाही विसरणार...
By admin | Published: February 13, 2017 12:49 AM2017-02-13T00:49:37+5:302017-02-13T00:49:37+5:30
स्वभाव भावला : देशभरातील तरुणाईची भावना;
कोल्हापूर : पहिल्यांदाच राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी झालो अन् विविधांगी कलात्मक ज्ञान अनुभवयास मिळाले. नवे मित्र मिळाले. महोत्सवातून आनंदोत्सव साजरा करताना अनेक आठवणींनी मनात ऋणानुबंधाचे घर तयार केले आहे. इथल्या आठवणी जीवनात कायमच राहतील. कोल्हापूरचे वातावरण प्रेमळ असून त्याची सतत जाणीव होत राहील, अशा दिलखुलास भावना रविवारी ‘शिवोत्सव’मधील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी व्यक्त केल्या.
यात भोपाळच्या माखनलाल चतुर्वेदी विद्यापीठाचा महेश प्रजापत म्हणाला, रायपूरपेक्षा अतिउत्तम कोल्हापूर आहे. एकमेकांना सहकार्य करण्याची प्रचंड इच्छाशक्ती इथल्या लोकांत आहे. पत्रकारितेचा विद्यार्थी असलो तरी कलेचा छंद असल्याने सहभागी होता आले. हा महोत्सव भविष्यात माझ्या करिअरसाठी उपयोगी ठरेल. बिहारमधील आॅलन मिथिला विद्यापीठाची स्नेह उपाध्या हिने महोत्सवातून मोठा आनंद मिळत असल्याचे सांगितले. ती म्हणाली, शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्वभाव भावला. विद्यापीठातील निसर्गरम्य वातावरणाने माझी छायाचित्र टिपण्याची गोडी वाढविली असल्याचे छत्तीसगडमधील खैरागडाच्या इंदिरा संगीत कला विद्यापीठाच्या मिनीला साहू हिने सांगितले. अमृतसरच्या गुरुनानक विद्यापीठाचा सतवेंद्रपालसिंह म्हणाला, महोत्सवात विविध राज्यांतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मला ‘छोटा भारत’चे दर्शन घडले. हरियाणातील महर्षी दयानंद विद्यापीठाची प्राची शर्मा हिने महोत्सवातील सहभागाने आत्मविश्वास वाढला असून, कोल्हापूरचे वातावरण, जेवण खूपच छान वाटल्याचे सांगितले.