कोल्हापूर : शिवाजी स्टेडियमची खेळपट्टी पुन्हा बहरणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 11:21 AM2018-08-02T11:21:03+5:302018-08-02T11:23:21+5:30

पश्चिम महाराष्ट्रातील क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी स्टेडियममधील खेळपट्टी गेल्या तीन वर्षांपासून दुर्लक्षित राहिली आहे. ही खेळपट्टी नव्याने तयार करण्यासाठी उत्तम काळ असतानाही त्याकडे जिल्हा क्रीडा कार्यालय दुर्लक्ष करीत आहे, याबद्दल अनेक क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे.

   Kolhapur: Will the pitch of Shivaji Stadium re-emerge? | कोल्हापूर : शिवाजी स्टेडियमची खेळपट्टी पुन्हा बहरणार का?

 कोल्हापुरातील शिवाजी स्टेडियममधील खेळपट्टीला केवळ लोखंडी बॅरिकेट्स लावले आहेत. (छाया : नसीर अत्तार)

googlenewsNext
ठळक मुद्देशिवाजी स्टेडियमची खेळपट्टी पुन्हा बहरणार का?दोन महिन्यांपासून लोखंडी कुंपन; देखभालीकडे दुर्लक्ष

सचिन भोसले

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी स्टेडियममधील खेळपट्टी गेल्या तीन वर्षांपासून दुर्लक्षित राहिली आहे. ही खेळपट्टी नव्याने तयार करण्यासाठी उत्तम काळ असतानाही त्याकडे जिल्हा क्रीडा कार्यालय दुर्लक्ष करीत आहे, याबद्दल अनेक क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे.

कोल्हापूरचे वैभव असणाºया या मैदानात विक्रमवीर भाऊसाहेब निंबाळकर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष व भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार चंदू बोर्डे, अजित वाडेकर, कपिल देव, हनुमंतसिंग, सुनील गावस्कर, विश्वनाथ, सलीम दुराणी, फारूक इंजिनिअर, मन्सूर अली पतौडी, पांडुरंग साळगावकर, संदीप पाटील, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, वेस्ट इंडीजचा ब्रायन लारा, श्रीलंकेचा अर्जुन रणतुंगा ते क्रिकेटचे दैवत सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, महंमद अझरुद्दीन, नवज्योतसिंग सिद्धू, संजय मांजरेकर यांच्यापासून ते अगदी आता भारतीय संघातून प्रतिनिधित्व करणारा सुरैश रैना अशा एक ना अनेक दिग्गजांनी सामन्यादरम्यान आपल्या फलंदाजीचे प्रदर्शन याच खेळपट्टीवर केले आहे.

यात रणजी ते आंतरराष्ट्रीय प्रथम श्रेणीचे सामनेही याच मैदानात झाले आहेत. यासह स्थानिकांतून महाराष्ट्राला रणजीपटूही याच मैदानाने दिले आहेत. यात रमेश हजारे, मिलिंद कुलकर्णी, सचिन उपाध्ये, नंदकुमार बामणे, रमेश कदम, सदा पाटील, संग्राम अतितकर, आदींचा समावेश आहे.

ही बाब आजच्या पिढीतील खेळाडूंना कदाचित पटणारही नाही; कारण या मैदानाची आजची दुर्दशा त्याला कारणीभूत ठरली आहे. ही दुर्दशा रोखण्यासाठी मैदानाचा आत्मा असणारी खेळपट्टी पूर्ववत व्हावी, अशी मागणी क्रिकेटपटूंकडून होत आहे.

१९७१ - सौराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र (रणजी) पॉली उम्रीगर गौरवार्थ सामना, १९७८ - चंदू बोर्डे गौरव सामना, १९७९- महाराष्ट्र-बडोदा (रणजी), १९८२ - मुंबई- पश्चिम विभागीय संघ, पश्चिम विभागीय भारतीय संघ विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील प्रथम श्रेणीचा सामना, १९८६- २५ वर्षांखालील भारत-श्रीलंका यांच्यातील प्रथम श्रेणीचा सामना, १९८८- जिल्हा युवा संघ विरुद्ध इंग्लडचा आर्डब्ले, १९९०- इंग्लंडमधील ससेक्स कौंटी संघ विरुद्ध जिल्हा युवा संघ, १० एप्रिल १९९०- विल्स क्रिकेट संघ- महाराष्ट्र, पांडुरंग साळगावकर गौरव सामना, १९९१- बडोदा- महाराष्ट्र (पश्चिम विभागीय स्पर्धा), १९९२ - ज्येष्ठ प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या गौरवार्थ सामना, १९९४- विक्रमवीर भाऊसाहेब निंबाळकर यांच्या गौरवार्थ सामना, २००१- मुंबई विरुद्ध महाराष्ट्र (रणजी), २००५- महाराष्ट्र-उत्तरप्रदेश (रणजी), २००६- महाराष्ट्र -पंजाब (रणजी), आदी सामने या खेळपट्टीवर झाले आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून खेळपट्टीची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे एकही सामना झाला नाही. गेल्या दोन महिन्यांपासून केवळ खेळपट्टीला लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. मात्र, कार्यवाही काहीच नाही. त्यामुळे ही खेळपट्टी पुन्हा होईल की नाही, याबाबत क्रिकेटपटूंना शंका आहे.
 

देशातील अनेक क्रिकेटपटूंनी या मैदानावरील खेळपट्टीवर पाय रोवून फलंदाजी केली आहे. याच मुशीतून कोल्हापूरचे अनेक क्रिकेटपटूही राज्यासह देशालाही दिले आहेत. त्यामुळे ही खेळपट्टी क्रीडा कार्यालयाने लवकर पूर्ववत करावी.
- नंदकुमार बामणे,
माजी राष्ट्रीय क्रिकेटपटू

 

 

 

 

Web Title:    Kolhapur: Will the pitch of Shivaji Stadium re-emerge?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.