कोल्हापूर बंद कडकडीत पाळणार
By admin | Published: June 5, 2017 01:14 AM2017-06-05T01:14:01+5:302017-06-05T01:14:01+5:30
कोल्हापूर बंद कडकडीत पाळणार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेतकऱ्यांनी आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिल्याने कोल्हापुरातील व्यवहार बंद राहणार आहेत. विविध संघटना व राजकीय पक्षांनी संपात उडी घेतली असून कडकडीत बंद पाळून तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा, दुधाला ५० रुपये प्रतिलिटर दर द्या, शेतीमालाला हमीभाव द्या, आदी मागण्यांसाठी १ जूनपासून शेतकरी संपावर आहेत. भाजीपाला, दुधासह इतर मालाची आवक-जावक ठप्प झाली आहे.
सरकारच्या पातळीवर चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी संपूर्ण मागण्या मान्य झाल्याशिवाय शेतकरी मागे हटण्यास तयार नाहीत. आंदोलन तीव्र करण्यासाठी आज, सोमवारी सर्वच शेतकरी संघटना व राजकीय पक्षांनी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. त्यानुसार संघटनांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ‘कोल्हापूर बंद’चा
निर्णय घेतला असून, त्या दृष्टीने नियोजन केले आहे. ‘सिटू’व किसान सभेच्या वतीने आज, सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनेही प्रत्येक तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करून शेतकऱ्यांच्या भावना सरकारदरबारी पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहेत. गेले चार दिवस शेतकऱ्यांची आक्रमकता वाढत असून, ‘कोल्हापूर बंद’ची हाक दिल्याने सगळी यंत्रणा कोलमडणार आहे. मोर्चामुळे तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालय आज दणाणणार आहे.
शिवसेनाही संपात सहभागी
आजच्या शेतकरी संपाला शिवसेनेने पाठिंबा दिला असून, संप यशस्वी करण्यासाठी सर्वांनी आपले व्यवहार बंद ठेवून बळिराजाला पाठिंबा द्यावा; अन्यथा शिवसैनिक त्यांचे व्यवहार बंद करतील, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, सुजित चव्हाण, दुर्गेश लिंग्रस व शिवाजी जाधव यांनी पत्रकातून दिला आहे.