कोल्हापूरकर रविवारी धावणार स्वत:साठी, ‘लोकमत महामॅरेथॉन’चा रंगणार थरार; ‘बीब कलेक्शन एक्स्पो’ आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 09:22 AM2018-02-17T09:22:34+5:302018-02-17T09:26:20+5:30
संपूर्ण कोल्हापूरला वेध लागलेली ‘राजुरी स्टील’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’ स्पर्धा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. ‘मी धावतो माझ्यासाठी’ हा संदेश देण्यासाठी रविवारी (दि. १८) या महामॅरेथॉनमध्ये कोल्हापूरकर, धावपटू, खेळाडू धावणार आहेत.
कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूरला वेध लागलेली ‘राजुरी स्टील’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’ स्पर्धा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. ‘मी धावतो माझ्यासाठी’ हा संदेश देण्यासाठी रविवारी (दि. १८) या महामॅरेथॉनमध्ये कोल्हापूरकर, धावपटू, खेळाडू धावणार आहेत.
या महामॅरेथॉनच्या माध्यमातून करवीरनगरीमधील क्रीडासंस्कृतीमध्ये नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे. या महामॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना आज, शनिवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत पोलीस ग्राउंड येथील अलंकार हॉल येथे टी-शर्ट आणि बीब (चेस्ट नंबर), गुडी बॅग वाटप करण्यासाठी ‘बीब कलेक्शन एक्स्पो’ होणार आहे.
सर्व शहर एकत्र यावे, आपापसांत जिव्हाळा निर्माण व्हावा आणि मैत्री वृद्धिंगत व्हावी, शहरात एकोपा वाढावा हा मुख्य उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ‘लोकमत’ समूहाने ही महामॅरेथॉन आयोजित केली आहे. येथील पोलीस ग्राउंडमधून रविवारी महामॅरेथॉनचा प्रारंभ होणार आहे. यात पहिल्यांदा सकाळी सहा वाजता २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉनला सुरुवात होईल. यानंतर १० किलोमीटर पॉवर रन, फॅमिली व ज्येष्ठ नागरिकांसाठी फन रन आणि ५ किलोमीटर या गटांमध्ये अर्धमॅरेथॉन होणार आहे. यानंतर आठ वाजता दिव्यांग रन होईल.
राज्यभरातील धावपटू या महामॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत. विविध गटांसाठी एकूण सहा लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत. सर्व संरक्षक दले, पोलीस, होमगार्ड, विशेष दलांतील धावपटूंसाठी विशेष बक्षीस आहेत. कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच होणारी महामॅरेथॉन अनोखी आणि सहभागी नागरिक, धावपटू, खेळाडूंसाठी संस्मरणीय ठरणार आहे.
‘बीब’असणे आवश्यक
महामॅरेथॉनमध्ये केवळ नोंदणी केलेल्या स्पर्धकास प्रवेश देण्यात येईल. स्पर्धकांनी या दिवशी बीब (चेस्ट नंबर) घेऊन येणे अत्यावश्यक आहे. या ‘बीब’शिवाय स्पर्धकांना पोलीस ग्राउंडमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. त्यासह धावपटू, स्पर्धकांना सहभागाचे मेडल, ब्रेकफास्ट मिळणार आहे.
गटनिहाय महामॅरेथॉन सुरू होण्याची वेळ
* २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन : ६ वाजून १५ मिनिटे
* १० किलोमीटर पॉवर रन : ६ वाजून ३० मिनिटे
* ५ किलोमीटर फन रन : ६ वाजून ४० मिनिटे
* ३ किलोमीटर फॅमिली रन : ६ वाजून ४५ मिनिटे
धावपटू, स्पर्धकांनी पहाटे पाच वाजता यावे
महामॅरेथॉनमधील विविध गटांत सहभागी झालेल्या धावपटू, स्पर्धक आणि नागरिकांनी पहाटे पाच वाजता पोलीस ग्राउंड येथे उपस्थित राहावे. पहाटे ५ वाजून ५५ मिनिटांनी वॉर्मअपला सुरुवात होईल. त्याचा समारोप ६ वाजून ५ मिनिटांनी होणार आहे. यानंतर २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉनची सुुरुवात होईल.
सध्या टी.व्ही., सोशल मीडियामुळे अनेकांचे दैनंदिन व्यायामाकडे दुर्लक्ष होत आहे. त्याचा परिणाम म्हणजे समाजात विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे. ते टाळण्यासह प्रत्येकाने आपले आरोग्य सुदृढ राखण्यासाठी नियमितपणे व्यायाम करणे आवश्यक आहे. धावणे हा व्यायाम प्रकार चांगला आहे. आरोग्याबाबत दक्ष आणि सजग करणारा महामॅरेथॉन हा ‘लोकमत’चा उपक्रम कौतुकास्पद आहे. मॅरेथॉनला एक नवे रूप देत कोल्हापूरच्या क्रीडापरंपरेतील नव्या पर्वाची सुरुवात ‘लोकमत’च्या माध्यमातून होत आहे. आरोग्याबाबत लोकांना सजग करण्यासह विजेत्यांसाठी मोठ्या रकमेची बक्षिसेदेखील या ‘महामॅरेथॉन’मधून मिळणार आहेत. धावपटू, खेळाडूंसह नागरिकांना या महामॅरेथॉनच्या माध्यमातून एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे.
- खासदार धनंजय महाडिक