कोल्हापूर : ‘जाधव इंडस्ट्रीज’ ठरला वूमेन्स लीगचा विजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 02:11 PM2018-05-28T14:11:05+5:302018-05-28T14:11:05+5:30
नीशा बगेडिया, मृदूल शिंदे यांच्या उत्कृष्ट खेळी व गोलच्या जोरावर जाधव इंडस्ट्रीजने छत्रपती शिवकन्या संघावर मात करत पहिल्या कोल्हापूर वूमेन्स लीग स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.
कोल्हापूर : नीशा बगेडिया, मृदूल शिंदे यांच्या उत्कृष्ट खेळी व गोलच्या जोरावर जाधव इंडस्ट्रीजने छत्रपती शिवकन्या संघावर मात करत पहिल्या कोल्हापूर वूमेन्स लीग स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.
शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत रविवारी रात्री जाधव इंडस्ट्रीज व छत्रपती शिवकन्या या दोन संघांत अंतिम सामना झाला. प्रारंभापासून दोन्ही संघांनी आक्रमक व वेगवान खेळाचे प्रदर्शन करत वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला.
जाधव इंडस्ट्रीजकडून लाको भुतिया, सोनाली सुतार, जुलेखा बिजली, रिया बोळके, नीशा बगेडिया, गीता दास, तर छत्रपती शिवकन्या संघाकडून प्यारी झा झा, मृणाल खोत, ऐश्वर्या हवालदार, समृद्धी कटकोळे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
पुरुष फुटबॉल संघाला लाजवेल असा खेळ महिलांनी केला. त्यामुळे उपस्थित महिला रसिकांनी टाळ्यांची उत्स्फूर्त दाद दोन्ही संघांनी दिली. २४ व्या मिनिटास जाधव इंडस्ट्रीजकडून नीशा बगेडिया हिने पहिल्या गोलची नोंद करत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर शिवकन्या संघाकडून प्यारी झा झा, मृणाल खोत, ऐश्वर्या हवालदार यांनी सामना बरोबरीत आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.
उत्तरार्धात एक गोलने पिछाडीवर असलेल्या छत्रपती शिवकन्या संघाने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा जाधव इंडस्ट्रीजच्या भक्कम बचावफळीपुढे टिकाव लागला नाही.
६३ व्या मिनिटास जाधव इंडस्ट्रीजकडून मृदुल शिंदे हिने गोल करत संघास २-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर शिवकन्याकडून आक्रमक व उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन झाले. मात्र, त्यांना अखेरपर्यंत आघाडी कमी करून बरोबरी साधता आली नाही. त्यामुळे हा सामना जाधव इंडस्ट्रीजने जिंकत स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. तत्पूर्वी तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात आर. आर. चॅलेंजर्स संघाने महाराष्ट्र क्विन्स संघाचा १-० असा पराभव केला.
या सामन्यात आर. आर. कडून श्रृतिका चौगुले हिने एकमेव गोल केला. विजेत्या संघास ३१ हजार, तर उपविजेत्या छत्रपती शिवकन्या संघास २१ हजार रोख व चषक प्रदान करण्यात आला.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ शाहू छत्रपती, विफा महिला समितीच्या अध्यक्षा मधुरिमाराजे, प्रकाश पाटील, माणिक मंडलिक, प्रमोद पाटील, चंद्रकांत जाधव, आंतरराष्ट्रीय फुटबॉल प्रशिक्षक फ्लेक्स सरोगथी, तेजस्विनी सरनोबत,निवेदक विजय साळोखे,आदी मान्यवर उपस्थित होते.
उत्कृष्ट खेळाडू
फॉरवर्ड - प्यारी झा झा (छत्रपती शिवकन्या), हाफ - गीता दास (जाधव इंडस्ट्रीज), डिफेन्स - जब्बा मणी टुडो, गोलरक्षक - बनिता (जाधव इंडस्ट्रीज), मालिकावीर - नीशा बगेडिया(जाधव इंडस्ट्रीज), सामनावीर - लाको भुतिया, लढवय्या खेळाडू - प्यारी झा झा.