कोल्हापूर : शेतीपंप वीज दरवाढीविरोधात २४ डिसेंबरला चक्काजाम : एन. डी. पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 02:53 PM2018-12-01T14:53:54+5:302018-12-01T14:55:58+5:30
शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाºया सरकारला धडा शिकवण्यासाठी २४ डिसेंबरला पुणे-बंगलोर महामार्गावर चक्का जाम आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी दिली.
कोल्हापूर : शेती पंपांची वीजदरवाढ कमी करण्याबरोबरच चुकीची बिले १५ आॅगस्टपूर्वी दुरुस्त करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते; पण आश्वासनापलिकडे काहीच झाले नसून, आता शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत झाला आहे.
शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाºया सरकारला धडा शिकवण्यासाठी २४ डिसेंबरला पुणे-बंगलोर महामार्गावर चक्का जाम आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी दिली.
प्रा. पाटील म्हणाले, भाजप सरकारने चार वर्षांत पाचवेळा वीज दरवाढ करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच चुकीची बिल आकारणी करून मानगुटीवर थकबाकीचा बोजा दिला, या विरोधात २७ मार्च २०१८ ला विधानभवनावर धडक मोर्चा काढला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ऊर्जा सचिव अरविंद सिंग, संजीवकुमार, अभिजित देशपांडे, आदींसोबत बैठक झाली.
त्यावेळी झालेल्या चर्चेत राज्यातील ४१ लाख शेतीपंपधारक वीज ग्राहकांची बिले १५ आॅगस्टपूर्वी तपासून दुरुस्त केले जाईल. अचूक बिलांच्या आधारे नवीन कृषी संजीवनी योजना राबविण्यात येईल, सर्व उपसा जलसिंचन योजनांची वीज बिले १.१६ रुपये प्रति युनिट दराने भरून घेतली जातील. उच्चदाब वीज ग्राहकांच्या बिलातील थकबाकी १५ आॅगस्टपूर्वी निकालात काढली जाईल, आदी मागण्या मान्य केल्या होत्या. यापैकी एकाही मागणीची आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नसल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले.
रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सरकार खडबडून जागे झाले असून, १० किंवा १२ डिसेंबरला बैठक घेण्याचे पुन्हा आश्वासन दिल्याचे प्रताप होगाडे यांनी सांगितले; पण आता नुसती बैठक आणि आश्वासने नकोत, वीज दरवाढ, थकबाकी व शासकीय पाणीपट्टी दरवाढ रद्द करण्याबाबत ठोस अंमलबजावणी पाहिजे.
अंमलबजावणी केली तरच आंदोलनाबाबत विचार करू, अन्यथा २४ डिसेंबरला ठरल्याप्रमाणे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुणे-बंगलोर महामार्गावर शिरोली पुलाची येथे रस्ता रोको करून चक्का जाम केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार, सर्व आमदार, लोकप्रतिनिधी, शेतकरी सहभागी होतील, असे होगाडे यांनी सांगितले.
यावेळी बाबासाहेब पाटील-भुयेकर, आर. जी. तांबे, विक्रांत पाटील-किणीकर, चंद्रकांत पाटील, एस. ए. कुलकर्णी, जे. पी. लाड, आर. के. पाटील, महादेव सुतार, मारुती पाटील उपस्थित होते.