कोल्हापूर : छतावरून कोसळून कामगार ठार, कागल पंचतारांकित वसाहतीतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 06:26 PM2018-06-06T18:26:54+5:302018-06-06T18:26:54+5:30
कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये कारखान्याच्या छताचे पत्रे बसवीत असताना सिमेंटचा पत्रा फुटून चाळीस फुटांवरून खाली कोसळून कामगार जागीच ठार झाला. बाजीराव आनंदा साळोखे (वय ४५, रा. पोहाळे तर्फ आळते, ता. पन्हाळा) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार बुधवारी सकाळी घडला.
कोल्हापूर : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये कारखान्याच्या छताचे पत्रे बसवीत असताना सिमेंटचा पत्रा फुटून चाळीस फुटांवरून खाली कोसळून कामगार जागीच ठार झाला. बाजीराव आनंदा साळोखे (वय ४५, रा. पोहाळे तर्फ आळते, ता. पन्हाळा) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार बुधवारी सकाळी घडला.
अधिक माहिती अशी, उद्यमनगर येथील उद्योजक शामराव देशिंगकर यांच्या कारखान्यात बाजीराव साळोखे हा गेल्या वीस वर्षांपासून काम करीत होता. देशिंगकर यांनी कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथे दुसरा कारखाना सुरू केला आहे. त्यामुळे बाजीरावसह अन्य कर्मचारी तेथे काम करीत होते.
आठ दिवसांपूर्वी वादळी पावसाने कारखान्याचे काही पत्रे उडून गेले होते. सोमवार (दि. ४) पासून हे पत्रे बसविण्याचे काम सुरू होते. फॅब्रिकेशनच्या कामगारांना मदत करण्यासाठी बुधवारी सकाळी बाजीराव साळोखे छतावर चढला होता. अचानक सिमेंटचा पत्रा फुटून चाळीस फुटांवरून तो खाली कोसळला.
डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अन्य कामगारांनी त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या मृत्यूची बातमी गावात समजताच ग्रामस्थांसह, नातेवाईक, मित्रपरिवाराने सीपीआर आवारात गर्दी केली होती. त्याच्या पत्नीने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. प्रामाणिक आणि कष्टाळू कर्मचारी म्हणून त्याची ओळख होती. त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.